Anti Terrorist Squad  Sarkarnama
विदर्भ

धर्मांतरणात सहभागाचा आरोप असलेला युवक एटीएसच्या जाळ्यात...

गेल्या दीड महिन्यांपूर्वी पुसद येथील वसंतनगर Vasdant Nagar at Pusad परिसरातील डॉ. फराज शहा Dr. Faraj Shaha यालाही अटक करण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

यवतमाळ : लखनौच्या एटीएस (विशेष तपास पथका) ने मुस्लिम धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली येथील एका तरुणास उत्तर प्रदेशातील कानपूर येथून शुक्रवारी (ता. एक) अटक केली आहे. धीरज गोविंद जगताप देशमुख (वय 38 वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो यवतमाळच्या वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनीतील रहिवासी आहे. एटीएसच्या या कारवाईने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुस्लिम धर्मांतर प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेशातील लखनौ एटीएस करीत आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी पुसद येथील वसंतनगर परिसरातील डॉ. फराज शहा यालाही अटक करण्यात आली होती. डॉ. शहा याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा यवतमाळच्या धीरज जगताप या युवकाशी संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला असून मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात देशभरातील विविध राज्यांमध्ये एटीएसने कारवाई केलेली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून एटीएसने धीरजला कानपूर येथून अटक केली आहे.

त्याला अटक केल्याची माहिती मिळताच यवतमाळच्या स्थानिक एटीएस पथकाने आज धीरजच्या घराची झडती घेतली. परंतु, तेथे त्याचे वृद्ध आई-वडील राहत असल्याचे समोर आले. धीरजबाबत फारशी कुणालाही माहिती नाही. तो धर्मांतरप्रकरणात अर्थसाहाय्य करण्याचे काम करीत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी धीरज याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा संशय आहे. तेव्हापासून तो मुस्लिम धर्म परिवर्तनाच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते. तो विवाहित असून त्याला एक छोटी मुलगी आहे. पत्नी मुलीसह माहेरी निघून गेल्याचे सांगण्यात आले. तो व्यवसायाने कंत्राटदार असून त्याचे पॉलिटेक्निकचे शिक्षण पुसद येथे झाले होते. त्यामुळे तो पुसद व काळी दौलतखान येथील मुस्लिम युवकाच्या संपर्कात आला होता.

मुस्लिम धर्म परिवर्तनासाठी पुसद येथेच त्याचे ’ब्रेन वॉश’ करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, यवतमाळच्या एटीएस पथकाने धीरज याच्या यवतमाळ येथील घराची झडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. धीरजच्या प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात आलेले काही लोक अजूनही पुसदमध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच त्याचा यवतमाळ शहरातील काही राजकीय नेत्यांशी संपर्क असून त्या दृष्टीने स्थानिक एटीएस पथक तपास करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान एटीएस समोर आहे.

कुटुंबीयांना जबर धक्का

व्यवसायाने कंत्राटदार असलेला, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला, शांत स्वभावाच्या धीरजला एटीएसने अटक केल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चार महिन्यांपूर्वी त्याच्याशी कुटुंबातील व्यक्तींचा संवाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन नातेवाइकांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT