MP Balu Dhanorkar about VIP Guest Housr Sarkarnama
विदर्भ

बाळू धानोरकरांच्या संकल्पनेतून ‘हे’ गेस्टहाऊस होणार संग्रहालय, मुख्यमंत्र्यांनी द्यावा निधी…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : ब्रिटिशांच्या कार्यकाळात चंद्रपुरात ‘सराई’ हे गेस्टहाऊस बांधण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह मोठमोठ्या विभूतींनी येथे वास्तव्य केले आहे. सद्यःस्थितीत हे गेस्टहाऊस अखेरच्या घटका मोजत आहे. कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या गेस्टहाऊसला संग्रहालयामध्ये परिवर्तित करण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

ब्रिटिशांनी येथे राज्य केले. त्यांच्या कार्यकाळात येथे सराई हे व्हीआयपी विश्रामगृह बांधण्यात आले. देशासाठी झटणाऱ्यासोबत मोठमोठ्या व्यक्तींनी येथे काही क्षण घालविले. याच सराईची आता बिकट अवस्था झाली आहे. डागडुजी करून सराईला चांगले करण्याऐवजी मनपाने त्यासमोर लाखो रुपयांचे सौंदर्यीकरण करून या ऐतिहासिक इमारतीचे विद्रुपीकरण करण्याचे चुकीचे काम करीत आहे. हे बांधकाम तात्काळ पडण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या आहेत. त्यासोबतच खासदार बाळू धानोरकर यांच्या माध्यमातून चंद्रपूरचे पहिले ऐतिहासिक संग्रहालय याच इमारतीत बनवण्यात येणार आहे.

चंद्रपुरची सराय ही इमारत इतिहासाची साक्ष आहे, चंद्रपुरात महात्मा गांधी, आलेले असताना ते याच इमारतीत थांबले होते. देशातील इतरही महान व्यक्ती याच इमारतीत थांबलेले आहेत. जगात अशा इमारतींच्या संरक्षणाची चर्चा होत असताना आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना सराई इमारत मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. चंद्रपुरातील विविध संस्था ही इमारत वाचावी, यासाठी धडपडत आहेत. पण महानगरपालिका मात्र यासाठी उदासीन दिसून येते. सराई गेस्टहाऊसला संग्रहालय करण्यासाठी व तिच्या जतनासाठी राज्य शासनाला निधी मागण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

दोन ऑक्टोबर १९२१ रोजी चंद्रपूरचे तत्कालीन उपयुक्त गोपीनाथ बेउर यांच्या हस्ते सराई गेस्टहाऊसचे उदघाटन करण्यात आले होते. त्यावेळी या इमारतीच्या बांधकामासाठी सरकारी कार्यालय, तत्कालीन प्रतिष्ठित व्यापारी, खाणी व मिल यांच्यासोबतच गोंडराजाचे वारस गोविदशहा बापू, सर हुकूमचंद रामभागत, राजे लक्ष्मणराव भोसले, रणशाह बापू, फकीरशाह बापू, पतृजी खोब्रागडे आदींनी लोकवर्गणी गोळा केली. २३ हजार ५६ रुपयांत या वास्तूचे काम झाले. टी. आर. श्रीनिवास या कंत्राटदाराने ही वास्तू उभी केली होती. १९ फेब्रुवारी १९२७ रोजी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तत्कालीन गृहमंत्री इ. राघवेंद्रराव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ही इमारत 'कोलो नियल पद्धती'ने बनविण्यात अली आहे. ब्रिटिश पद्धतीने बनविण्यात आलेली ही विदर्भातील पहिली इमारत असल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सराई या वास्तूचे चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक महत्व व स्थापत्य शैलीचा विचार करता ही वस्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावी. त्यासोबतच येथे चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी निधी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येथे लवकरच संग्रहालय उभे करण्याची करू, असे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT