Ad. Satish Uke
Ad. Satish Uke Sarkarnama
विदर्भ

भाजप नेत्यांच्या विरोधात बोलल्यामुळेच झाली कारवाई, उके कुटुंबीयांचा आरोप…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : ईडीचे धाडसत्र थांबण्याचे नावच घेत नाहीये. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीने धडक कारवाई केल्यानंतर आज भल्या पहाटे बव्हंशी कॉंग्रेस नेत्यांचे नागपुरातील वकील ॲड. सतीश उके यांच्यावर ईडीने धाड टाकली. जमीन खरेदी प्रकरणात ही कारवाई केली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पण तसे नसून सातत्याने भाजप नेत्यांच्या विरोधात बोलत असल्याने सूडबुद्धीतून ही कारवाई केली असल्याच्या उके कुटुंबीयांचा आरोप आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी ॲड. सतीश उके (Ad. Satish Uke) आणि त्यांचे भाऊ प्रदीप यांना ११ वाजता अटक केली. सतीश उके यांनी सातत्याने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधातील खटले चालविले. जस्टीस लोया मृत्यू प्रकरणातही त्यांनी पुरावे सादर केले होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि आणखी काही नेत्यांचे ते वकील आहेत आणि भाजप नेत्यांच्या विरोधात सतीश उके सातत्याने नागपूरसह (Nagpur) मुंबई आणि पुणे येथे पत्रकार परिषदा घेऊन माहिती देत होते, पुरावे सादर करीत होते. त्यामुळेच भाजप नेत्यांनी ही कारवाई केल्याचेही सतीश उके यांच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे.

लॅपटॉप जप्त..

एका जमीन खरेदी प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असल्याची चर्चा सकाळी उके यांच्या निवासस्थानाच्या परिसरात होती. कारण जमीन खरेदीचे प्रकरण ॲड. उकेंवर सुरू होते. पण ते जमीन प्रकरण २००७ पूर्वीचे आहे. त्याचा या कारवाईशी अर्थाअर्थी संबंध नाही. सत्याची बाजू मांडत कायद्याने लढत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खटले दाखल केले होते, भिवगडे हत्याकांडाचे प्रकरण लावून धरले होते, जस्टीस लोया प्रकरणात पुरावे सादर केले होते. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

नागपुरात ईडीच्या छाप्याचे सत्र सुरू?

विधी आणि राजकीय क्षेत्रात ॲड. सतीश उके यांचे मोठे नाव आहे. अनेक राजकीय नेत्यांचे ते वकील आहेत. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या, त्याचे वकीलपत्र सतीश उकेंनी घेतलेले आहे. नाना पटोले यांनी रश्‍मी शुक्ला यांच्या विरोधात जो खटला दाखल केला आहे, त्यात सतीश उके वकील आहेत. आजच्या कारवाईने मुंबई, पुण्यानंतर नागपुरातही ईडीच्या छाप्याचे सत्र सुरू तर झाले नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित केला जातोय.

संजय राऊतांची घेतली होती भेट..

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे गेल्या आठवड्यात तीन दिवस नागपुरात होते. त्यावेळी ॲड. सतीश उके यांनी त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत काय झाले, हे कळू शकले नाही. पण ईडीच्या कारवाईची कुणकुण तर त्यांना लागली नव्हती ना, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. पण आजच्या कारवाईने नागपुरात राजकीय वातावरण गरम झाले आहे, हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT