Akola Mahabij
Akola Mahabij Sarkarnama
विदर्भ

प्रशासकीय अधिकारी महाबीजसाठी अनुत्सुक का? अकोला `एमडी`ची पुन्हा बदली !

सरकारनामा ब्यूरो

अकोला : महाबीजचे राज्यातील (Maharashtra) मुख्यालय अकोल्यात (Akola)आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचीही स्वतःची एक 'चाॅईस' असते. नावडत्या ठिकाणी नियुक्ती मिळाल्यास ते आपले 'सोर्सेस' वापरून हव्या त्या ठिकाणी आपली बदली करवून घेतात, हे नेहमीच बघण्यात आले आहे. पण ही बाब अकोला (Akola) महाबीजसाठी घातक ठरते आहे. त्यामुळे या महत्वाच्या ठिकाणी एखादा चांगला अधिकारी मिळणार की नाही, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. नफ्यात चालणाऱ्या या संस्थेच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी (IAS) येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 'नापसंती'चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण वर्षभराच्या आतच एमडींची बदली होत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे.

डिसेंबर 2020 मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 17 फेब्रुवारी 21 ला महाबीज मुख्यालय गाठले. आल्या आल्या कामकाजाचा आढावा घेतला. नंतर अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाल्याचे आदेश धडकले. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली गेली.

रेखावार हे सुद्धा अनेक दिवस रुजू झालेच नाहीत. दरम्यान त्यांचाही बदली आदेश धडकला. त्यांनतर ऑक्टोबर 21 मध्ये महाबीजचे एमडी म्हणून रुचेश जयवंशी यांनी महाबीजची सूत्रे हाती घेतली. मात्र वर्षभराच्याआतच त्यांचा बदलीचा आदेश धडकला आहे. नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नासपसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.

का नको आहे आयएएस अधिकाऱ्यांना महाबीज?

अकोल्यात राज्याचे मुख्यालय असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली. बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कार्य महाबीजमध्ये होते. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. वरिष्ठ ‘आयएएस’ या पदावर काम करण्यास इच्छूक नसतात.

या पदावर काम करण्यात ‘कमी’पणाची भावना असल्याने अधिकाऱ्यांचे इतरत्र बदलीसाठी प्रयत्न सुरू असतात. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच त्यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होत असल्याचा प्रत्यय गत दशकभरात वारंवार आला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महाबीजला व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यकाळ पूर्ण करणारा अधिकारी मिळत नसल्याने नफ्यात चालणाऱ्या या संस्थेच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT