Pusad, Dist. Yavatmal.
Pusad, Dist. Yavatmal. Sarkarnama
विदर्भ

mobile ban : मोबाईलबंदीच्या निर्णयानंतर बान्सीत आता स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण...

दिनकर गुल्हाने

Pusad Taluka News : किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदीचा घालण्याचा निर्णय घेणारी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या पुसद (Pusad) तालुक्यातील बान्सी ग्रामपंचायत पहिली ठरली होती. काल झालेल्या बाल सभेत शाळकरी मुलांना स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूर्व प्रशिक्षणामुळे शाळकरी मुले स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन करू शकतील, असा विश्‍वास गावकऱ्यांना आहे.

शाळकरी मुलांना मोबाईल वापरावर बंदीचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) गाजला. या निर्णयावर बांसी ग्रामपंचायतीने पूर्णतः अंमलबजावणी केली असून शिक्षक, गावकरी व विद्यार्थी यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे. त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांमध्ये पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सरपंच व त्यांच्या चमूने १० ते १८ वयोगटाच्या बान्सीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण देण्याची संकल्पना ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बालसभेत मांडली. बालसभेच्या अध्यक्षस्थानी अंकुश मा़णिक पत्रे हा विद्यार्थी होता. या बालसभेत उच्चशिक्षित सरपंच गजानन टाले, जिल्हा परिषद (ZP) मराठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमुख व जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकरे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

आजचे युग स्पर्धेचे असून प्रशासनातील अधिकारी पदावर आरूढ होण्यासाठी स्पर्धा परीक्षांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिले गेल्यास पुढील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे होईल. त्यामुळे शाळेतील पूर्व प्रशिक्षणाच्या बाल सभेतील ठरावाला बालक, पालक व गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला व ठराव एकमताने मंजूर झाला. अशा प्रकारचा निर्णय राबविणारी बान्सी ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.

या प्रशिक्षणासाठी सुरुवातीला तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. या प्रशिक्षणात महिन्यातून एक वेळ तज्ज्ञाचे मार्गदर्शन (गेस्ट लेक्चर), नियमित सराव चाचणी, नियमित शारीरिक प्रशिक्षण, प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर घेण्यात येईल. तसेच वर्ग पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गातील पाच विद्यार्थांना शारीरिक प्रशिक्षण व बौद्धिक प्रशिक्षण देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या बालसभेला ग्रामपंचायतीचे सचिव पी.आर. आडे, संतोष आगलावे, माधव डोंगरे, जुगलकिशोर शर्मा, निरंजन राठोड, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद मराठी शाळा व जनता शिक्षण प्रशिक्षण मंडळ विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. बालसभेत आभार जाधव यांनी मानले.

मोबाईल बंदीनंतर शाळकरी मुले चौका चौकात मोबाईल घेऊन बसण्याऐवजी क्रिकेट व कबड्डी मैदानावर खेळत आहेत. हा चांगला बदल लक्षात घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी शाळा काळातच पूर्वतयारी व्हावी, या हेतूने स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा बाल सभेत ठराव घेण्यात आला. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित वर्ग व लायब्ररीची व्यवस्था ग्रामपंचायत उपलब्ध करून देत आहे. यासाठी आर्थिक तरतूद केली असून ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार आहे. सैनिकी शाळेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण देण्यात येईल.

- गजानन टाले, सरपंच, बान्सी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT