devendra fadnavis maharashtra logo sarkarnama
विदर्भ

Assembly Election 2024 : लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेची भीती, भाजपचे मंथन अन् चिंतन

Rajesh Charpe

लोकसभेला विदर्भात मोठा पराभव झाल्याने आता भाजपच्यावतीने विधानसभेपूर्वी चिंतन आणि मंथन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी विदर्भातील जिल्हानिहाय कोअर कमेटी आणि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नागपूरच्या रवी भवन येथे बोलावण्यात आले आहेत. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार सर्वांचे मत आणि सूचना ऐकून घेतल्या.

सकाळी दहा वाजतापासून मुनगंटीवार यांनी जिल्हानिहाय चर्चेला सुरुवात केली आहे. गडचिरोली पासून तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कोअर कमेटीचे सदस्य सध्या नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी साडेपाच वाजताची वेळ देण्यात आली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) आणि अकोल्याचे अनुप धोत्रे यांचा अपवाद वगळता भाजपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. स्वतः मुनगंटीवार चंद्रपूरमधून पराभूत झाले आहेत. विदर्भातील भाजपच्या मतांचा टक्कासुद्धा घसरला आहे. त्यामुळे विधानसभेची चिंता भाजपला सतावत आहे. नेते आणि कार्यकर्त्यांचा निष्काळजणीपणा आणि अनागोंदी कायम राहिल्यास विधानसभेतही मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'संविधानात बदल' हा नॅरेटिव्ह भाजपच्या ( Bjp ) पराभवाला कारणीभूत ठरला असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे फक्त 0.3 टक्केच मतांची टक्केवारी घटल्याचेही सांगण्यात येते. भाजपच्या पराभवाला संविधानाशिवाय अनेक बारिक-सारिक कारणे आहेत. त्याची चर्चा होत नसली तरी कार्यकर्त्यांची नाराजी, गटबाजी, उपऱ्यांना वारंवार दिली जात असलेली संधी, दुखावलेले निष्ठावंत, निष्क्रिय पदाधिकारी अशी बरीच कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात. पक्षात असेच सुरू राहिले तर विधानसभेत पराभव निश्चित असल्याचेही सांगण्यात येते.

भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याने सांगितल्यानुसार, आम्ही शंभर जागा जिंकल्या तर दिवाळी साजरी करण्यासारखे होईल एवढा असंतोष आणि वाईट परिस्थिती पक्षाची आहे. जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिसते, उमजते ते नेत्यांना दिसत नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचे त्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT