Ajit Pawar  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच महायुतीमधील वाचाळवीरांना दिली तंबी, म्हणाले...

राजेश पाटील - Rajesh Patil

Ajit Pawar to Mahayuti leaders : राहुल गांधी यांच्यावरील वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधील वाचाळवीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच तंबी दिली. 'आरोप करताना परिस्थितीचे भान ठेवावे. साध्या आणि सुसंस्कृत भाषेत उत्तर द्यावे. राग आम्हालाही येतो परंतु, तो व्यक्त करण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. वरिष्ठ नेते किंवा सरकार अडचणीत येईल अशी भाषा टाळली पाहिजे.', असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचा मेळावा तसेच लाभार्थी सन्मानानिमित्त शारदा ज्ञानपीठच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सेनेचे आमदार गायकवाड यांनीच राहुल गांधी यांचे मुंडके छाटून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते.

त्यानंतर भाजपचे खासदार संजय बोंडे यांनी राहूल गांधी यांच्या जिभेला चटके देऊ असे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वत्र चांगलाच संताप निर्माण झाला आहे. गायकवाड आणि बोंडे यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. याचा महायुतीच्या नेत्यांचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, 'मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा ठेवाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते?', असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.

याशिवाय 'सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहीजे ते यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं आहे. त्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत. यशवंतराव चव्हाण यांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. भाषा कशी असली पाहीजे? तर उद्या कुणी आपल्यावर टीका करायला नको. बोलताना अनेक प्रकारचे शब्दप्रयोग करता येतात. त्यामुळे महायुतीचं सरकार त्या विचारांचं आहे. जर कुणी एखाद दुसरं काही बोलून गेलं तर त्याला महायुती सरकारचा पाठिंबा आहे, असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी जाहीरपणे सांगू इच्छितो.', असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लोटांगण घालण्यासाठी दिल्लीला जात नाही - मुख्यमंत्री शिंदे

याचबरोबर 'तुम्ही लाडक्या बहिणी आम्हाला जेवढी ताकद द्याल, तेवढी योजनेची रक्कम वाढवली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना दिले. महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, की मी दिल्लीला जातो तो निधी खेचून आणण्यासाठी. मला मुख्यमंत्री करा असे लोटांगण घालण्यासाठी दिल्लीला जात नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहतील तोपर्यंत आरक्षण कायम राहील, असे स्पष्ट करतानाच येत्या निवडणुकीत सावित्रीच्या लेकी विरोधकांना योग्य धडा शिकवतील, असे ते म्हणाले. शासनाच्या योजना राजकीय लाभासाठी नसून त्या जनतेच्या सेवा व सुविधेसाठी आहेत, असेही ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT