<div class="paragraphs"><p>MLA Sandeep Dhurve and Ajit Pawar</p></div>

MLA Sandeep Dhurve and Ajit Pawar

 

Sarkarnama

विदर्भ

आमदार डॉ. संदीप धुर्वेंना अजित पवारांनी दिला ‘हा’ शब्द…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : बांधांवर जाऊन शेतकऱ्यांना शब्द दिला. पण तो खरा नाही केला. शेतकरी आत्महत्या करीत आहे. आता तरी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देणार आहात की नाही, असा प्रश्‍न यवतमाळ जिल्ह्यातील आमदार डॉ. संदीप धुर्वे (MLA Dr. Sandeep Dhurve) यांनी सभागृहात केला. त्यावर ती पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देऊ, असा शब्द उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार धुर्वेंना दिला.

प्रति गुंठा ८५० रुपये म्हणजे एकरी ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याला मिळते. पुन्हा पीक कर्ज घेण्याची वेळ येते, तेव्हा तो शेतकरी उसनवारी किंवा खासगी सावकाराकडे जाऊन कर्ज घेतो आणि कर्ज फेडतो. पुन्हा कर्ज मिळते तेव्हा व्याजाच्या स्वरूपात सावकाराला देतो. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी पारवा विविध कार्यकारी सोसायटी आहे. येथून कर्ज घेतलेले प्रामाणिक ९९ टक्के शेतकरी कर्ज फेडतात. त्यांचा पूर्ण रोष आमच्यावर होतो. जे शेतकरी कर्जाची परतफेड करीत नाहीत, त्यांचे कर्ज तुम्ही माफ करता. मग आम्ही परतफेड करून पाप करतो काय, अशा प्रश्‍नांची सरबत्ती मतदारसंघात गेल्यावर केली जाते, असे आमदार धुर्वे म्हणाले.

हा केवळ माझ्या मतदारसंघातील किंवा माझ्या यवतमाळ जिल्ह्याचा प्रश्‍न नाहीये, तर अख्ख्या महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांचा आहे. तुम्ही सरकार तयार करण्यापूर्वी बांधावर जाऊन घोषणा केली होती, ती पूर्ण केली नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तुम्हाला काही नाही, पण त्यांना खांदा द्यायची वेळ आमच्यावर येते. आता तरी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी ५० हजार रुपये देणार आहे का आणि गेल्या दीड वर्षापासून सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाहीये, त्यामुळे त्या दीड वर्षाचे व्याज सरकार शेतकऱ्यांना देणार आहे का, असे प्रश्‍न आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी सभागृहात उपस्थित केले.

ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी हा प्रश्‍न विचारला होता, तेव्हा त्याला सविस्तर उत्तर दिले होते. तरीही आमदार डॉ. धुर्वे तोच प्रश्‍न पुन्हा का विचारत आहेत, हे कळायला मार्ग नाही. आम्ही पुन्हा सांगतोय की, ते पैसे आम्ही देणार आहोत. आतापर्यंत ३१ लाख ८१ हजार खातेदारांना २० हजार २९० कोटी रुपये दिलेले आहेत आणि या पुरवणी मागण्यांमध्ये काही रक्कम ठेवलेली आहे. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर तो विषय संपविण्यात येणार आहो. ५० हजार रुपयांची परतफेड आणि २ लाखाच्या वर कर्ज असलेल्यांचाही विचार यावेळी आम्ही करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

दिलेल्या शब्दापासून आम्ही दूर गेलोही नसतो. पण कोरोनाचे संकट आले आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा टॅक्स यायला पाहिजे होतो, तो मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. सभागृहात बसलेल्यांपैकी अनेक जण शेतकरी आहेत. ज्या काही घोषणा आम्ही केल्या, त्यापासून पळ काढण्याची आमची भूमिका अजिबात नाहीये. उशीर होतो आहो आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे होत नाहीये, हे मी कबूल करतो. पण तो पूर्ण पैसा आम्ही देणार, हा शब्द मी महाराष्ट्रातल्या जनतेला देतो, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT