Mahayuti Politics  Sarkarnama
विदर्भ

BJP News : भाजपचा झेंडा हाती घेण्यासाठी राष्ट्रवादीत काम करीत आहोत का? अजितदादांचे शिलेदार संतापले

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु झाले आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप जाहीर व्हायचा आहे. असे असताना नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार लढणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी ठामपणे सांगितले.

एवढेच नव्हे तर आमच्या मित्रपक्षांनी कमळाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)नेते चांगलेच संतापले आहेत. आम्ही भाजपचा झेंडा हाती घेण्यासाठी राष्ट्रवादीत काम करीत आहोत का? असा खडा सवाल शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत खडागंजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा सोडण्यात आली नव्हती. गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीने मागितली होती. विधानसभेत काही जागा मिळतील अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील इच्छुकांची आहे. नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा पैकी दोन जागांची मागणी महायुतीकडे राष्ट्रवादीने केली आहे. यात पश्चिम नागपूर आणि ग्रामीणमधील काटोल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावाला अद्याप महायुतीकडून होकार वा नकार कळवण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आशेवर होते. मात्र, बंटी कुकडे यांनी सर्वच जागा भाजपच (BJP) लढणार आहे असे सांगून राष्ट्रवादी व शिवसेनेला एकाही जागा मिळणार नाही असे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार पश्चिम नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी बॅनर, पोस्टर लावणे सुरू केले आहे. बंटी कुकडे शहर अध्यक्ष आहेत. जागा वाटपाचा तसेच उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार त्यांना नाही. आमचे वरिष्ठ नेते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागा वाटपाची चर्चा करीत आहेत. कोणाला कुठल्या जागा द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. बंटी कुकडे यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही.

त्यामुळे महायुतीत नाराजी निर्माण होऊ शकते. दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्या नाहीत तर पुढे काय करायचे याचा आम्ही नक्कीच विचार करू. दोन वर्षांपासून आम्ही अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत काम करीत आहोत. ते कमळाचा प्रचार करण्यासाठी नाही, असेही प्रशांत पवार यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT