Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : ‘मी अजित पवार... मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...’ ऐकायला मिळणारच !

Atul Mehere

Nagpur - Gondia NCP Political News : ‘मी अजित पवार... मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...’ हे शब्द लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या कानांवर पडणार आहेत. ते कसे, कधी होईल हेही सर्वांना लवकरच कळेल. पण हे नक्कीच होणार असल्याचा दावा करीत राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गौप्यस्फोटाच्या बंदुकीचा बार उडविल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (After Amol Mitkari, 'this' minister fired the bar of secret blast gun)

दादा मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची इच्छा आहे. ही बाब लवकरच साकार होणार आहे. ‘समजणाऱ्याला इशारा पुरेसा असतो’. त्यामुळे दादा कसे व कधी सीएम होतील, हे साऱ्या महाराष्ट्राला लवकरच कळेल, असा ठाम दावा मंत्री आत्राम यांनी केला. राजकारणात काहीही होऊ शकते. ‘नथिंग इज इम्पॉसिबल’ असे नमूद करीत ते म्हणाले की, दादांना देवेंद्र फडणवीस यांचीही साथ आहे.

अर्थात ज्यांचे संख्याबळ जास्त त्या पारड्यात मुख्यमंत्रिपद, असे समीकरण ठरणे स्वाभाविकच आहे, असे संकेत त्यांनी दिले. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना पुण्याचे पालकमंत्रिपद हवे होते, ही बाब जगजाहीर आहे. फक्त त्यांना हे पद मिळण्यासाठी थोडा विलंब झाला. राहिला प्रश्न भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा, तर ते कोणत्याही मुद्द्यावर नाराज नाहीत, असेही आत्राम म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पूर्वी एकाच जिल्ह्याची जबाबदारी होती. आता त्यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजकारणात काही गोष्टी चालत असतात. काही तडजोडी कराव्या लागतात. चंद्रकांतदादा फारच सुस्वभावी व समजूतदार नेते आहेत. त्यामुळे ते नाराज असूच शकत नाहीत, असे आत्राम म्हणाले. एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री राहतील.

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली, तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता फडणवीसांनीच हे विधान केल्यावर त्यावर आणखी काय बोलायचं. कोणत्याही क्षणी ही बाब प्रत्यक्षात उतरू शकते, असं ते म्हणाले. गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. हेदेखील आधीपासूनच ठरलं होतं.

खासदार प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे त्यांनी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. आता गोंदियात पक्षवाढीचे काम करायचे आहे. राज्यभरात पक्षवाढीचे काम जोमाने सुरू होणार असल्याचेही राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT