Ajit Pawars convoy  Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Convoy : अजित पवारांचा ताफा अमरावती-नागपूर मार्गावर शेतकऱ्यांनी अडवला!

Amar Ghatare

Amravati News : अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाहन ताफा शेतकऱ्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अडवला. तिवसा येथे हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे शनिवारी (ता. 9) अमरावती शहरात आयोजित विविध कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर आले होते. सर्व नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार नागपूरच्या दिशेने सायंकाळी मार्गस्थ झाले. प्रवासात असताना अमरावती शहरापासून सुमारे 40 किलोमीटरवर असलेल्या तिवसा येथे शेतकरी आंदोलक अचानक त्यांच्या वाहन ताफ्यासमोर आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बळीराजा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा या मार्गावरून पुढे जात होता. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा येत असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर कुणाला काही कळण्यापूर्वीच मोर्चातील काही आंदोलन शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापुढे ठाण मांडले.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे अजित पवारांच्या ताफ्यातील पोलीस व सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. मोर्चा या मार्गावरून जात असल्याची माहिती असल्याने तिवसा पोलीसांचा बंदोबस्त आधीच महामार्गावर तैनात करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकार घडला.

वाहन ताफा अडवणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला अजित पवार यांच्याशी बोलायचे आहे अशी मागणी रेटून धरली. तर पवारांचा ताफा केव्हाच निघून गेला आहे, त्यामुळे अन्य वाहनांना जाऊ द्यावे असे पोलिसांनी आंदोलकांना सांगितले. परंतु आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लोटण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काही आंदोलकांची आणि पोलिसांची झटापटही झाली. पोलिसांनी त्यांच्या जवळ असलेल्या लाठ्या आडव्या करीत आंदोलकांना मागे ढकलले. परिणामी संतप्त झालेल्या आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.

अखेर पोलिसांनी कसाबसा रस्ता मोकळा करून ताफ्याला नागपूरच्या दिशेने रवाना केले. आंदोलन करणारे सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त होते. ते नागपूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांनी हा प्रकार केला, अशी माहिती पोलिसांनी 'सरकारनामा'ला दिली. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही किंवा आंदोलकांवर कोणत्याही बळाचा वापर करण्यात आलेला नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

ज्या ठिकाणी अजित पवारांचा ताफा अडवण्यात आला ते तिवसा गाव काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे हे आंदोलन घडवून आणण्यामागे काँग्रेसचा सहभाग होता का?, अशी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आंदोलकांपैकी कुणीही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ, सचिवालय सध्या उपराजधानीतच तळ ठोकून आहे. अशातच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मंत्र्यांचे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू आहेत. तर या दौऱ्यांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्यानंतरही काही आंदोलक पोलिसांना हुलकावणी देत आपला हेतू साध्य करत आहेत. त्यामुळे विदर्भातील पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT