Ajit Pawar, maharashtra winter session
Ajit Pawar, maharashtra winter session Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : फडणवीसांच्या वक्तव्याचा उल्लेख करत अजितदादांचा बावनकुळेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून ( १९ नोव्हेंबर ) सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या एक दिवस अगोदरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'तो त्यांचा पक्षांतर्गंत प्रश्न आहे. त्यांनी कोणाला काय करावे, त्यांचे त्यांनी बघावे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही आमचे एकत्र आहोत. आम्ही त्यांच्या दोघांमध्ये नाक खुपसायचे कारण नाही. त्यांनी नाकाखालून आमचे सरकार काढले. त्यामुळे आम्ही तिथे नाक खुपसत नाही,' असा टोला पवारांनी लगावला.

यावेळी अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "आम्ही तीन आठवड्याचे अधिवेशन घ्या, अशी मागणी केली होती. दोन वर्षे कोरोनामुळे अधिवेशन झाले नाही. त्यामुळे साहाजिकज विदर्भ-मराठवाडा या मागासलेल्या भागाच्या प्रश्नाच्या संदर्भात सर्वांगीण विकासासाठी वेळ मिळायला पाहिजे. तो वेळ मिळाला नाही. म्हणून हे अधिवेशन तीन आठवड्याचे घेऊन ती भर काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न हा जर सरकारने केला तर विरोधी पक्षाच्यावतीने तशाप्रकारची मागणीदेखील आहे, असे पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले होते बावनकुळे?

'जो जो समाज फडणवीस यांच्याकडे गेला, त्या समाजावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे. फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी नाहीतर महाराष्ट्राचे भवितव्य हे देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात, असेही बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT