Anur Dhotre, Sanjay Dhotre and Randhir Sawarkar
Anur Dhotre, Sanjay Dhotre and Randhir Sawarkar Sarkarnama
विदर्भ

Akola District News : अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी ‘या’ खासदार पुत्रावर !

सरकारनामा ब्यूरो

Akola Lok Sabha Election News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील ४४ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (For the first time, Anup was appointed to an important post)

राजकीय जीवनात प्रथमच महत्त्वाच्या पदावर अनुप यांना नियुक्ती मिळाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ २००४ पासून सातत्याने भाजपकडे राहिला आहे. संजय धोत्रे हे १४ व्या लोकसभेत सन २००४ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १५, १६ आणि १७ व्या लोकसभेतही त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेले दोन वर्षांपासून हे गंभीर आजाराने ग्रासले असल्याने सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.

खासदार धोत्रेंचे वारसदार म्हणून त्यांचेच भाचे व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्याकडे बघितले जात आहे. अकोला जिल्ह्यात पक्ष संघटनेवर असलेली त्यांची पकड सर्वश्रुत आहे. त्यांनाच भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजय धोत्रे यांच्या जागेवर निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आता त्यातच अनुप संजय धोत्रे यांना अकोला लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख जाहीर करून भाजपने याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

वडिलांचा वारसा; भावाचा अनुभव..

खासदार संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघासोबतच मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदारसंघांची चांगली बांधणी केली होती. गेल्या २० वर्षांपासून जिल्ह्यातील भाजप संघटनेची बांधणी करण्यासोबतच मराठा समाजाला भाजपसोबत जोडून ठेवण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचा वारसा आता त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना मिळणार असून, भाजप पक्ष संघटनेतील त्यांचे आतेभाऊ आमदार रणधीर सावरकर यांच्या अनुभवाचा अनुप यांना चांगलाच फायदा होणार आहे.

खा. संजय धोत्रे यांचा आमदार ते खासदार प्रवास..

सन १९९९ ते २००४ ः मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार, सन २००४ मध्ये १४ व्या लोकसभेत प्रथम खासदार म्हणून निवड, सन २००९ मध्ये १५व्या लोकसभेत दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवड, सन २०१४ मध्ये १६व्या लोकसभेत तिसऱ्यांदा खासदार, सन २०१९ मध्ये १७व्या लोकसभेत चौथ्यांदा खासदार, सन २०१९ मध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपदावर त्यांची नियुक्ती झाली होती.

राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या उपस्थितीत १४ जूनला जाहीर सभा..

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा राज राजेश्वर नगरीमध्ये १४ जून रोजी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेचे आयोजन अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर होणार आहे. भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा प्रथमच अकोला दौऱ्यावर येत आहे.

या जाहीर सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर उपस्थित राहतील. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. ही जाहीर सभा आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी मानली जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT