Akola News, 19 July : मुर्तिजापूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कारणावरून एका वारकऱ्याने सोशल मीडियावर भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टार्गेट केल्याच्या कारणावरून आमदार हरिष पिंपळे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशीच फोनवरून वारकऱ्याला चांगलाच दम दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा इतर वारकऱ्यांनी निषेध केला आहे.
मुर्तिजापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. असाच रोष अर्जुन लोणारे या वारकऱ्याने शहरातील एका व्हाट्सअॅप ग्रुपवर व्यक्त केला. यात लोणारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समर्थकांबाबत कटू शब्दात टीका केली.
हा प्रकार भाजपच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी आमदार पिंपळे यांच्या कानावर घातला. त्यामुळे चिडून आमदार पिंपळे यांनी लोणारे यांना फोन करून चांगलाच दम देत जाब विचारला. लोणारेही एवढ्यावर थांबले नाही तर पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले. दरम्यान, याप्रकरणाची बातमी समजताच वारकऱ्यांमधून आमदार पिंपळे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुर्तिजापूरचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी प्रकरण सावरण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची माफी मागण्याचा सल्ला लोणारे यांना दिला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही अशी भूमिका वारकरी लोणारे यांनी घेतली.
तर लोणारे यांनी अतिशय खालच्या शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समर्थकांवर टीका केली. त्यांची भाषा अत्यंत वाईट होती. त्यामुळे त्यांना फोन करून जाब विचारला, यापूर्वीही त्यांनी असाच प्रकार केल्याचं आमदार हरिष पिंपळे यांनी सांगितलं.
मात्र, केवळ विकासाच्या मुद्यावरून आमची व्हाट्सअॅपवर चर्चा सुरु होती. त्यात मी कुठेही कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. मात्र, आमदार पिंपळे यांनी चिडून मला मारण्याची धमकी दिली आणि पोलिसांकडून देखील माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वारकरी अर्जुन लोणारे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.