Akola West Assembly Constituency Sarkarnama
विदर्भ

Akola West Assembly Constituency : इच्छुकांच्या भाऊगर्दीने भाजपची डोकेदुखी वाढली !

सरकारनामा ब्यूरो

Akola West Assembly Constituency : भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या रिक्त झालेल्या अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. कारण येथे इच्छुकांची रांग मोठी आहे. शर्मा कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिल्यास भाजपवर घराणेशाहीचा आरोप होतो, नव्हे तशी ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे येथे भाजप नेत्यांची चांगलीच कसरत बघायला मिळत आहे.

लोकसभेचा उमेदवार भाजपने निश्चित केला असला तरी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात नेमके कोणत्या उमेदवाराला उभे करायचे हा प्रश्न भाजपसमोर उभा ठाकला असतानाच काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पुन्हा साजिद खान पठाण यांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब झाले आहे. आता प्रतीक्षा भाजपच्या उमेदवाराची आहे.

लोकसभा निवडणुकीसोबतच आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघातही पोट निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याला आता वेग आला असून, काँग्रेसकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने पुन्हा एकदा माजी नगरसेवक साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपकडून नेमकं कोणाला उमेदवारी हा सस्पेन्स कायम आहे. भाजपमधील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार जाहीर करताना भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे साजिद खान पठाण यांच्या विरोधात उमेदवार कोण, असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसमध्येही उमेदवारीबाबत चढाओढ सुरू असतानाच साजिद खान पठाण, झिशान हुसेन, बबनराव चौधरी, मदन भरगड, विवेक पारस्कर आदींनी निवडणुकीसाठी तयारी दर्शवली होती, तर प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारीसाठी साकडेही घातले होते. मात्र, लोकसभेच्या यादीसोबतच काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महापालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले साजिद खान पठाण यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांना चांगलीच टक्कर दिली होती. मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी आघाडी मिळविली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देणाऱ्या साजिद खान यांना 67 हजार 629 हजार मते मिळाली, तर भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या 2662 मतांनी निसटता विजय झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पराभूत होऊनही विजयी ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती, हे विशेष.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT