Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Amravati District Bank : कॉंग्रेसचे सदस्य फोडून बच्चू कडू अध्यक्ष तर झाले, पण आता सुरू झाला ‘ब्लाइंड गेम’

सरकारनामा ब्यूरो

Eight members were present in the meeting : अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तीन सभासद फोडून माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू अध्यक्ष झाले. पण त्याच तीन सदस्यांकडून ‘ब्लाइंड गेम’ खेळला जात आहे. बच्चू कडूंसाठी हा गेम चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. (Bablu Deshmukh along with 13 directors from his group remained absent)

काल (ता. ११) झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीला बबलू देशमुख यांच्यासह त्यांच्या गटातील १३ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा बँकेत सत्ताकारणाची रस्सीखेच पहायला मिळाली. बैठकीला आठ सभासद हजर होते. बाकी १३ गैरहजर होते. यामध्ये बच्चू कडूंना ज्या तीन सभासदांनी मदत केली, ते तीन सभासद अद्यापही समोर यायला तयार नाहीत.

प्रोसेडींगवर सह्या केल्यास ‘ते’ तिघे कोण, हे उजेडात येणार आहे. त्यामुळे ते तिघे अजूनही बबलू देशमुख यांच्यासोबत आहेत. सहकार कायद्यानुसार तीन बैठकांना सभासदांना अनुपस्थित राहता येते, त्यानंतर नाही. त्यामुळे आम्ही त्याची वाट बघू. नाहीतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करू, असे बच्चू कडूंचे म्हणणे आहे. दुसरीकडे प्रोसेडींगवर सह्या घेण्यासाठी कडूंचा खटाटोप सुरू असल्याची माहिती आहे. ‘त्या’ तीन सदस्यांनी सह्या केल्यास ते बबलू देशमुख यांच्या रडारवर येणार आहेत. त्यामुळे ते सध्या ‘मेन इन ब्लॅक’ बनले आहेत.

कोरमअभावी बैठक स्थगित करावी लागली, असा दावा बबलू देशमुख गटाने केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचा पराभव करून बँकेचे अध्यक्षपद पटकाविले. त्याचप्रमाणे अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटल्याने कडू व देशमुख यांच्या गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे होतीच.

आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती (Amravati) जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीला आमदार बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे, प्रा. नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पटेल, बाबूजी गायगोले, आनंद काळे, चित्रा डाहाणे आदी संचालक उपस्थित होते. तर बबलू देशमुख यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील १३ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे कोरमअभावी सभा स्थगित झाल्याचे देशमुख गटाचे म्हणणे आहे, तर सभा सुरळीत झाल्याचा दावा बच्चू कडू व अभिजित ढेपे यांनी केला.

संचालक मंडळाच्या बैठकीला आमचे सर्व १३ संचालक अनुपस्थित होते. शेतकऱ्यांनी (Farmers) मोठ्या विश्वासाने ही बँक आमच्याकडे सोपविली होती, मात्र बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पैशाच्या जोरावर बँकेत सत्ता स्थापित केली. शेतकरीविरोधी एकही मनसुबा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. बहुमत हे आमच्याकडेच आहे हे सिद्ध झाले, असे बबलू देशमुख यांचे म्हणणे आहे. तर उर्वरित सदस्य जरी बैठकीला येऊ शकले नाही तरी ते आमच्या सोबतच आहेत. कालच्या (ता. ११) सभेत अनेक ठराव घेण्यात आले. बहुमत आमच्याकडेच आहे, असे बॅंकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

देशमुख गटाचे सर्व संचालक एकाच ठिकाणी..

बबलू देशमुख यांच्या गटातील संचालक आमदार बळवंत वानखडे, सुरेखा ठाकरे, हरिभाऊ मोहोड, सुनील वऱ्हाडे, दयाराम काळे, प्रा. प्रकाश काळबांडे, मोनिका मार्डीकर, सुधाकर भारसाकळे, प्रवीण काशीकर, बाळासाहेब अलोणे व अन्य संचालक एकाच ठिकाणी असल्याचे छायाचित्र सुद्धा प्रसार माध्यमांना देण्यात आले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT