Harshjit Deshmukh Missing Sarkarnama
विदर्भ

Harshjit Deshmukh Missing : अमरावती विधान परिषदेत मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार ‘गायब’; 20 कोटींमध्ये निवडणूक मॅनेज झाल्याचा यशोमती ठाकुरांचा खळबळजनक आरोप

Yashomati Thakur alleges ₹15-20 crore deal Congress candidate Harshjit Deshmukh remains out of contact ahead crucial Amaravati MLC poll : चार दिवसांपासून संपर्काबाहेर असलेले हर्षजीत देशमुख नागपुरातील रुग्णालयात दाखल असले, तरी ICU मधून मुलाखती देत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने निवडणुकीत घोडेबाजाराचा होत असल्याचा आरोप केला आहे.

Pradeep Pendhare

Amaravati MLC Election : अमरावती विधान परिषद निवडणुकीची लढत आता केवळ राजकीय राहिलेली नसून ती आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या वादळात अडकली आहे.

काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख अचानक निवडणुकीच्या रणांगणातून गायब झाल्याची चर्चा सुरू असतानाच, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे.

भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे (Congress) हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांच्यात विधान परिषदेसाठी थेट लढत सुरू आहे. मात्र मतदानाच्या तोंडावर काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख हे गेल्या चार दिवसांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही ही बाब मान्य करत उमेदवाराशी संपर्क होत नसल्याचे सांगितले.

याच दरम्यान, देशमुख नागपूरमधील (Nagpur) एका खासगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे, ते अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असतानाच माध्यमांशी संवाद साधत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. अमरावतीचा उमेदवार मॅनेज झाल्यासारखा वाटतो आहे. 15 ते 20 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, ICU मध्ये असलेली व्यक्ती माध्यमांना मुलाखती कशी देऊ शकते? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला.

निवडणूक सर्वसामान्यांची राहिलीच नाही

ठाकुर यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याचाही आरोप केला. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या चर्चा आहेत. एवढी मोठी रक्कम फिरत असेल तर सरकार आणि यंत्रणा काय करत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही निवडणूक आता सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नसून पैशांच्या जोरावर प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस उमेदवारांचा निवडणुकीत आक्षेप चर्चेत

दरम्यान, या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे भाजपचे कार्यकर्ते विप्लव बजोरिया यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीदरम्यान त्यांचा अर्ज बाद झाला. विशेष म्हणजे, बजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप घेणारे स्वतः काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख होते. अर्ज बाद झाल्यानंतर बजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

महायुती अन् मविआकडील संख्याबळ

अमरावती विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडे 222 मतांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जात आहे, तर महाविकास आघाडीकडे सुमारे 148 मतांचेच बळ आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

आणखी कोणते ट्विस्ट समोर येणार.....

उमेदवाराचा अचानक संपर्क तुटणे, रुग्णालयात दाखल असल्याच्या चर्चा, मॅनेजमेंटचे आरोप आणि घोडेबाजाराच्या दाव्यांमुळे अमरावती विधान परिषद निवडणूक आता राज्यातील सर्वाधिक चर्चेची राजकीय लढत ठरत आहे. मतदानापूर्वी आणखी कोणते राजकीय ट्विस्ट समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT