Agitation Against Chandrakant Patil
Agitation Against Chandrakant Patil Sarkarnama
विदर्भ

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक...

Atul Mehere

उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. चंद्रमणीनगर गार्डन येथे आंबेडकरी अनुयायांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अजनी पोलिस ठाण्यात केली.

महापुरुषांनी स्वतः जवळील पैसे, लोकवर्गणी आणी लोकसहभागातून शाळा व शिक्षण संस्था स्थापन केल्या. त्यांचा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'भीक हा शब्द वापरून अपमान केला. महापुरुषांचा आदर्श घेऊन जगणाऱ्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रत्येक माणसाच्या भावनांचा देखील अपमान केल्याचा आरोप केला आहे. यामुळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी नागोराव जयकर, रमेश लोखंडे, राजेश सावरकर, अनिल पाटील, अनिकेत कुत्तरमारे, प्रफुल्ल भाजे, विजय कस्तुरे, सौरभ गजघाटे, टोनी चौधरी, विनोद पाटील, प्रवीण गजभिये, विनोद पाटील, लता जाधव, राकेश शेंडे, रमेश गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांत शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळातील विशेषतः भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी जाणीवपूर्वक राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. तसेच, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात भर घालत मंत्री पाटील यांनी तिघा महापुरुषांबाबत अवमानजनक विधान केले आहे. भाजपचे नेते हे जाणूनबुजून करीत असल्याचा आरोप सर्व स्तरांतून होऊ लागला आहे. एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारचे वक्तव्य करणे, अशोभनीय आहे. ती वेळ काय होती, हे त्यांनी समजून घेतलेले दिसत नाही. त्यावेळी महापुरुषांनी दान मागून शिक्षणाचे कार्य केले तर त्याला भिकेची उपमा देणे, अजिबात योग्य नाही. अशिक्षितांना शिक्षित करून त्यांनी देशाला प्रबुद्ध करण्याचे काम केले आहे, असे आंबेडकरी जनतेचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT