Amravati APMC Sarkarnama
विदर्भ

Amravati APMC Election : महाविकास आणि भाजपमध्ये होणार थेट लढत, तिसरे पॅनल उतरल्यास चुरस वाढणार !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचे सहकार व भाजपचे शेतकरी पॅनल गठीत झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व कोट्यवधींच्या उलाढालीने विदर्भात दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत अमरावती बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सहकार नेत्यांसोबत आता राजकीय नेतेही उतरल्याने निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे सहकार व भाजपचे शेतकरी पॅनल गठीत झाले आहे.

सहकारातील नेत्यांच्या नेतृत्वात तिसरे पॅनलही मैदानात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा आणि कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या शेतकरी पॅनलची घोषणा झाली आहे. महाविकासच्या सहकार पॅनलमध्ये उमेदवारही जवळपास निश्चित असले तरी आघाडीत सामील तीन पक्षांना समान जागावाटप हा अद्याप तिढा सुटलेला नाही.

सहकार क्षेत्रात काँग्रेसने आजवर वर्चस्व टिकवून ठेवले आहे. यशोमती ठाकूर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शिवसेनेच्या प्रीती बंड आहेत. यावेळी माजी खासदार अनंत गुढेही त्यांच्या सोबत आले आहेत. आमदार रवी राणा यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांचे बंधू सुनील राणा यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांना सोबत घेऊन शेतकरी पॅनेल जाहीर केले आहे.

आता भाजपच्या नेत्यांनीही सहकार क्षेत्रात जम बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी प्रयत्न सुरू केले असून ते आमदार राणांच्या सोबतीने पॅनलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कोट्यवधींची उलाढाल असल्याने ही बाजार समिती काबीज करण्यासाठी नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

एकत्रित लढल्यास विजय मिळवणे सोपे जाते, या सूत्राने महाविकास आघाडी एकसंघ राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तर या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी भाजप प्रणीत आमदार राणा यांच्या शेतकरी पॅनलची तयारी सुरू आहे. दोन्ही पॅनलमध्ये सहभागी नेत्यांनी आपापले उमेदवार पुढे दामटले असून जागावाटप करताना चांगलीच कसरत होणार असल्याचे चित्र सध्या दिसते.

तिसऱ्या पॅनेलचा उदय होणार?

सहकार क्षेत्रावर दबदबा ठेऊन असलेले विलास महल्ले यांचे गेल्या वीस वर्षांपासून अमरावती बाजार समितीवर वर्चस्व आहे. महल्ले गटाने स्वतंत्र पॅनेल गठीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप व राणा गटाकडून त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनाही त्यांची प्रतीक्षा आहे. दोन्ही पॅनलमध्ये जागा न मिळाल्यास उमेदवारांसाठी हा तिसरा पर्याय उपलब्ध असला तरी महल्ले गटाकडे उमेदवारांची वानवा नाही.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सहकार पॅनलमध्ये यशोमती ठाकूर, (Yashomati Thakur) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते, सहकारातले नेते बबलू देशमुख, विरेंद्र जगताप ही दिग्गजांची फळी आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे भाऊ सुनील राणा यांच्या शेतकरी पॅनलमध्ये भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व स्वाभिमानी पक्षाचे नेते आहेत.

या दोन्ही पॅनलमध्ये ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही. ते लोक तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असतील. सद्यःस्थितीत महाविकास आघाडीमध्ये असलेले विलास महल्ले तिसरे पॅनल उभे करू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT