Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu: बच्चू कडूंना मोठा धक्का: स्वपक्षातील आमदाराने केला 'प्रहार', धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत

Mangesh Mahale

राज्यातील दोन बड्या नेत्यांसोबत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 'प्रहार'चे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) हे बच्चू कडू यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मेळघाटचे आमदार असलेले राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पटेल यांनी आज एक बैठक आयोजित केली आहे. बैठकीचं पोस्टर व्हायरल झालं आहे. त्यात बच्चू कडू आणि प्रहार पक्षाचा उल्लेख नाही. पटेल यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लवकरच ते एकनाथ शिंदे यांचे 'धनुष्यबाण' हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

मेळघाट विधानसभा कार्यकर्ता संवाद बैठकीचा कार्यक्रम राजकुमार पटेल यांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे परिसरात पोस्टर झळकले आहे. या पोस्टरवर राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रोहित पटेल यांचे फोटो आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यावर फोटो आहे. पण आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांचा यात फोटो नसल्याने पटेल हे बच्चू कडूंवर नाराज आहेत का? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. या पोस्टरची सध्या चर्चा सुरु आहे.

आगामी विधानसभेसाठी पटेल यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द दिला आहे. विधानसभा 'प्रहार'कडून न लढता शिवसेनेकडून लढण्याच्या विचारात पटेल असल्याचे बोलले जाते. ते बच्चू कडू यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा अमरावती जिल्ह्यात रंगल्या आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहारचे दोन आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला पाठिंबा देत ते महाविकास आघाडीत सहभागी झाले. आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते.

त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले.सत्तास्थापनेत बच्चू कडूंच्या प्रहारनं महायुती सरकारच्या बाजूनं मतदान केलं. पण मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. अशातच त्यांचा आमदार शिवसेनेच्या वाटेवर आहे. पटेल काय निर्णय घेणार हे लवकर समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT