Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Amravati DCC Bank Loan : अमरावतीत शेतकरी कर्जाचा मुद्दा तापला; बावनकुळेंनी दिले मोठे निर्देश

Chandrashekhar Bawankule asks Amravati District Bank to reconsider 50% farmer loan decision : जिल्हा बँकेच्या 50% कर्जवाटपाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना; 18 हजार शेतकऱ्यांची KYC पूर्ण करण्याचे आदेश

Pradeep Pendhare

Amravati District Central Cooperative Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटपाच्या निर्णयावरून आता राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. शेतकऱ्यांना केवळ 50 टक्के कर्ज देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या सूचना देणार असल्याचे अमरावतीचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निर्णयाबाबत बावनकुळे यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे बच्चू कडू यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना 50 टक्केच कर्ज देऊ, असा ठराव घेता येत नाही. जिल्हा बँकेने 100 टक्के कर्ज दिले पाहिजे. 50 टक्के कर्ज देण्याचा निर्णय मागे घेण्यास सांगणार आहोत, असे बावनकुळे यांनी सांगितले. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या संदर्भात सुमारे 1200 ते 1300 निवेदने प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात सुमारे 18 हजार शेतकऱ्यांची (Farmer) कर्जमाफीसाठी KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. या शेतकऱ्यांची KYC पूर्ण करण्यासाठी कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण करतील, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 8 टक्के कर्जवाटप झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. अनेक मोठ्या बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवाटप झालेले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे, त्यांनी तातडीने बँकेत जाऊन कर्ज घ्यावे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 3200 शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले आहे. हा आकडा अमरावती जिल्ह्याला शोभणारा नाही, असे बावनकुळे म्हणाले. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. ज्या बँकांनी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला, त्या बँकांना वठणीवर आणू. ज्या बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही, त्यांची सरकारी खाती खाली करू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी

शेतकऱ्यांना दिवसाला 12 तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अमंलबजावणी केली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळाच्या विचारातून वगळण्यात आलेला नाही, असा दावा त्यांनी केला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा सोयाबीनच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यासाठी परवानगी

दरम्यान, कृषी, महसूल, ग्रामविकास आणि जलसंधारण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही बावनकुळे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सुट्टी घ्यायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असेल. परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे लागेल, असे बावनकुळे यांनी जाहीर केले.

बच्चू कडूंच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

अमरावतीतील कर्जवाटप, कर्जमाफीची KYC, दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती या मुद्द्यांवर बावनकुळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे. विशेषतः बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेच्या कर्जवाटपाच्या निर्णयावर बावनकुळेंनी थेट भूमिका घेतल्याने आता बच्चू कडू यांची प्रतिक्रिया काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT