Amravati News, 24 Aug : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आग लागल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत इतर बालकांना कक्षाबाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान नवजात शिशू अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक बिघाड होऊन स्फोट झाला. त्यानंतर कक्षात आग लागली आणि काही वेळातच धूर मोठ्या प्रमाणात पसरला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
कक्षात उपचार घेत होती १२ बालके
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात बालकांसाठी तीन अतिदक्षता कक्ष आहेत. आग लागलेल्या कक्षात त्यावेळी १२ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग आणि धूर लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रयत्नांदरम्यान तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काही बालकांवर सुपर स्पेशालिटीत उपचार
आगीतून वाचवण्यात आलेल्या काही बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चार बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या हाताला आणि पायाला भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य काही बालकांना किरकोळ भाजल्याची माहिती आहे. काही बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.
अग्निसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, नवीन इमारतीतील हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग काही काळापूर्वीच सुरू करण्यात आला होता. कमी वजनाचे, कमी दिवसांचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर या विभागात उपचार केले जातात. त्यामुळे अशा संवेदनशील विभागात आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम होती, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.