Yashomati Thakur devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

Amravati MLC Election : विधानपरिषदेचा धुरळा : अमरावतीत भाजपसाठी धोक्याची घंटा! काँग्रेसने ताकद लावल्यास 'गेम' उलटणार

Maharashtra Legislative Council News : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 मतदारसंघात निवडणूक होत आहे. दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेवर निवडणूक होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 मतदारसंघात निवडणूक होत आहे. 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रखडल्याने विधानपरिषद निवडणूक होऊ शकली नव्हती. मागील 6 महिन्यात 20 जिल्हा परिषद वगळता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली असून 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

17 पैकी बहुतांश ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण अमरावती मतदारसंघात यावेळी काँग्रेस व भाजपला विजयाची समान संधी आहे. काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यास ते भाजपचा पराभव करू शकतात, इतके संख्याबळ जुळवू शकतात. मात्र अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे व भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांची नावे समोर आली आहेत.

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास एकूण मतदार ४५३ इतके आहेत. त्यामध्ये भाजप १५२, शिवसेना २०, राष्ट्रवादी (अजित पवार ) ३२, युवा स्वाभिमान पक्ष २६ असे महायुतीचे एकूण २३० संख्याबळ आहे. तर काँग्रेस ११९, एमआयएम १६, बीएसपी ३, उबाठा १८, प्रहार २१, समाजवादी पार्टी २, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष १३, भाकप १, वंचित बहुजन आघाडी ६, अपक्ष २४ असे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होऊ शकते.

अमरावती विधान परिषद मतदारसंघाचा इतिहास पहिला तर या मतदारसंघातून भाजपचे (BJP) प्रवीण पोटे-पाटील यांनी २०१२ ते २०२४ या कालावधीत सलग प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदाही भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षांतर्गत पातळीवरही त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असल्याची चर्चा आहे.

भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांची नावे समोर आली आहेत. दरम्यान भाजपसमोर युवा स्वाभिमान पक्षाचे आव्हान आहे. या पक्षाचे आमदार रवी राणा यांनी भाजपने प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिल्यास आपण स्वतंत्र उमेदवार रिंगणात आणू, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी भाजपने डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह केला असून त्यास भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांचे समर्थन आहे. यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

आघाडीकडून सध्यातरी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेसकडून (Congress) अनिल अग्रवाल यांचे नाव पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मागील काही वर्षांपासून विधानपरिषद निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे.

दरम्यान, शिवसेनेनेही या जागेसाठी दावा ठोकल्याने भाजपसमोर आणखी पेच निर्माण झाला आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असून याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मला अंतिम व मान्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी मुंबई आणि अमरावतीत काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. त्याशिवाय युवा स्वाभिमान पक्षाकडून सुनील राणा इच्छुक असल्याचे समजते.

SCROLL FOR NEXT