Amravati News, 03 Feb : महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना 'युवा स्वाभिमान'ला जवळ केले असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटालाही सोबत घेतले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने आलेली नाराजी दूर करण्यासाठी महापौर भाजपचा, असा प्रचार निवडणुकीपश्चात राबविणाऱ्या युवा स्वाभिमानला त्यांच्याच शैलीत राष्ट्रवादीला जवळ करून चेकमेट दिला आहे.
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रभावक्षेत्रात युती धाब्यावर बसवून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेणारे आमदार रवी राणा आणि भाजपात राहून भाजपच्या अनेक उमेदवारांविरोधात खुली भूमिका घेतलेल्या माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांना अस्वस्थ करणारी व थेट संदेश देणारी खेळी अमरावतीच्या महापौरपदाचा उमेदवार ठरवताना भाजपने केली आहे.
मनपा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजप विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे केले होते. त्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा यांनी खुली भूमिका घेतली होती. आज महापौरपदासाठी नाव घोषित झालेल्या श्रीचंद तेजवानी यांच्या विरोधात पुरुषोत्तम बजाज यांचा प्रचार नवनीत राणा यांनी केला होता. दुसरे उमेदवार आशिष अतकरे यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी राजा बांगडे यांचा खुला प्रचार केला होता.
युवा स्वाभिमानमुळे भाजपचे डझनभर उमेदवार पराभूत झाल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड असंतोष होता. सध्या मनपातील आकड्यांचे गणित जुळवताना भाजपने १५ जागा मिळविणाऱ्या युवा स्वाभिमानला जवळ केले असले तरी श्रीचंद तेजवानी आणि आशिष अतकारे यांच्या नावाची घोषणा करून भाजपने राणा दाम्पत्याला थेट संदेश दिला आहे.
राजकीय स्वार्थासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात कृती सहन केली जाणार नसल्याचा तो संदेश आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला सोबत घेत राणांवर वचक आणण्याचीही राजकीय खेळी खेळली आहे. आमदार रवी राणा व आमदार संजय खोडके यांच्यातील विळ्या भोपळ्याचे सख्ख्य सर्वश्रुत आहे. प्रारंभी आमदार खोडके यांनी आमदार राणा युतीत असतील तर आम्ही राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
आपल्या भूमिकेवर ते नेहमीच ठाम राहतात, हे सर्वश्रुत असल्याने संख्याबळ जुळवताना भाजपसमोर अडचणी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर खोडके यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर ते युतीत सहभागी होण्यास सहमत झालेत. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वकाही व्यवस्थित होईल, असा शब्द दिला असून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, हे आमदार सुलभा खोडके यांचे विधान या पार्श्वभूमीवर सूचक ठरणारे आहे.
युवा स्वाभिमानची कोंडी करण्याच्या रणनीतीतून राष्ट्रवादीस झुकते माप देण्याची नीती भाजपने अवलंबली आहे. उपमहापौरपदावर बोळवण करीत स्थायी समिती या महत्त्वाच्या समितीची सूत्रे राष्ट्रवादीला सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. आमदार राणांवर थेट वार न करता राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिकार साधण्याचा भाजपचा डाव आहे. निवडणुकीनंतर सहानुभूती मिळवण्याचा राणा दाम्पत्याच्या राजकीय खेळीसह भाजपने त्यांचा कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीस जवळ करून झुकते माप देत राणांवर मात केली आहे.
महापालिकेत भाजपने २५ जागा मिळवून सर्वांत मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले असले तरी बहूमतासाठी त्यांना कुबड्या घेण्याची वेळ आली. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी असला तरी स्थानिक पातळीवर युतीत येण्यास ते युवा स्वाभिमानमुळे इच्छूक नव्हते. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलविण्यात आली. राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांमुळे भाजपप्रणीत महायुतीचे संख्याबळ आता ५१ वर गेले आहे. बहूमतासाठी ४४ चे संख्याबळ आवश्यक आहे. युवा स्वाभिमानकडे १५ संख्याबळ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.