Amravati Division Teachers Constituency : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या पसंतीच्या फेरीमध्ये आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत किरण सरनाईक यांच्याबरोबर काँग्रेसच्या आदिती पोहरे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये चुरस आहे.
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत, अनेक मतपत्रिकांवर जुनी पेन्शन योजना असा मजकूर लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांची बहीण भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे-बोंडे, शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने, भाजपचे दुसरे बंडखोर चंद्रशेखर भोयर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, विजुक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रशांत विघे, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर यांच्यासह 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या 26 उमेदवारांमध्ये पहिल्या पसंतीच्या फेरीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. विजयासाठीचा 16 हजार 518 मतांचा आकडा कोण गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती मतदारसंघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. यावेळी उमेदवारांची अधिक संख्या, महायुतीतील तीन जणांची बंडखोरी, त्यात झालेले भरघोस मतदान, याविषयी चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने विजयाचा कोटा ठरल्यानंतर तो पूर्ण करण्यात कोणी यशस्वी न ठरल्यास मतमोजणीच्या अनेक फेऱ्या होतात. या निवडणुकीतही उमेदवारांमधील स्पर्धा पाहता तशीच स्थिती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने आणि शिक्षक विखुरलेले असल्याने काही उमेदवारांनी तर आपले संपर्क दौरे वर्षभरापूर्वीच सुरू केले होते. या निवडणुकीत प्रचारावर झालेला प्रचंड खर्चदेखील चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत आजवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, या दोन प्रमुख संघटनांमध्येच पारंपरिक लढती पाहायला मिळाल्या आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अन्य कुणाला मिळते की, किरण सरनाईक दुसऱ्यांदा निवडून येणार, याचा निर्णय लवकरच लागणार आहे. सध्या तरी पहिल्या पसंतीच्या फेरीत किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. परंतु जुनी पेन्शन योजनेचा उल्लेख असलेल्या अनेक मतपत्रिका निघाल्याने, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
संगीता शिंदे यांना किती मताची पसंती मिळते याकडे महायुतीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांच्या मतांच्या आघाडीकडे देखील लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीत देखील बंडखोरी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे दत्तात्रय लहाने निवडणुकीच्या रिंगणात होते. महाविकास आघाडीतील बंडखोरी उमेदवाराला किती भोवते याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.