Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
विदर्भ

Jayant Patil : मनसेवर हिंदी भाषिकांचा राग, त्यामुळे पेच निर्माण होईल !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भाजपनेच शिवसेनेला फोडण्याचे काम केले आहे. सर्व हिंदूंची मते आपणालाच मिळावी; त्यात फाटाफूट होऊ नये याकरिता हा खटाटोप करण्यात आला असल्याचा आरोप माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील (Jayant Patil) पक्षबांधणीसाठी सध्या विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर त्यांनी काल सायंकाळी नागपूरमधील (Nagpur) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपचे (BJP) हिंदुत्व बेगडी आहे. हिंदुत्त्व सांगायचे नसते तर ते आचरणात आणायचे असते. शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात मराठी आणि हिंदू मतदार असल्याने ते भाजपला खटकत होते. त्याकरिता शिवसेनेला फोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजप आणि राज ठाकरे एकत्र येत आहे, याकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी सुरुवातीला यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र नंतर हा भाजप आणि मनसेचा प्रश्न असल्याचे सांगितले. भाजप आणि मनसे एकत्र येणार नाही की माहिती नाही मात्र, ते एकत्र आल्यास हिंदी भाषिकांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मराठी मतदार आहेत. हिंदी भाषिकांचा राग मनसेवर आहे, तर भाजपकडे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे दोघांमध्ये वेगळा पेच निर्माण होऊ शकतो, असे भाकीतही जयंत पाटील यांनी वर्तविले. असे झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचेही नुकसान होऊ शकते, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यता मोहीम सुरू आहे. त्याकरिता विदर्भातील अनेक भागांत जाऊन आलो. या मोहिमेला गती दिली जात आहे. पक्ष संघटनेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी पक्षाचे सदस्य वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT