Anil Deshmukh and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh News : वारकऱ्यांची काळजी घेत आहेत, चांगले आहे, पण शेतकऱ्यांचा कापूस घरातच; त्याचे काय?

सरकारनामा ब्यूरो

Anil Deshmukh on Farmers : विदर्भात अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे तर काही जिल्ह्यांत अगदीच तुरळक पाऊस आहे. पेरणी करावी की नाही, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. कर्ज वाटपातही अनियमितता आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले. (So far only approximately 37 percent of the loan has been disbursed)

आज (ता. २९) सकाळी नागपुरात देशमुख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कर्ज वाटपाच्या बाबतीत आम्हीं आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं की, नागपूर जिल्ह्यात १ लाख २२ हजार शेतकऱ्यांना वाटप करायचे होते. मात्र ४४ हजार ६०० शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले. आतापर्यंत अंदाजे ३७ टक्केच कर्ज वाटप झाले आहे.

युरिया १४ हजार ६५० मॅट्रिक टन खत द्यायला पाहिजे होत. मात्र, केवळ सात हजार ४०० मॅट्रिक टन म्हणजे अर्धेच देण्यात आले आहे. कर्ज वाटपाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी पीक विम्याचा १९ कोटी ५२ लाख प्रीमियम भरला आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना १२ कोटी देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांची काळजी घेत आहेत. त्यांना काय हवं, काय नको, हे बघत आहेत. परवा परवा तर त्यांनी पिण्याच्या पाण्यावरून जिल्हाधिकाऱ्याची खरडपट्टी काढली. ही चांगली गोष्ट आहे. पण इकडे कापसाला भाव नसल्यामुळे २५ टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सरकार म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचीही काळजी घ्यावी, असे आमदार देशमुख म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवरून तिढा निर्माण झाला आहे. यासंदर्भात विचारले असता, कालच्या बैठकीत कार्यकारिणीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. मी त्या बैठकीला नव्हतो. त्यामुळे त्यामध्ये काय चर्चा झाली मला कल्पना नाही. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. वरिष्ठ नेते त्याबद्दल सांगतील, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. ते सोडून सर्वांनी जनतेच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्याजवळ बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, अशा वेळी शासनाने बाकी गोष्टी बाजूला ठेवून त्यांना मदत करायला पाहिजे.

एक दिवस शिंदे (Eknath Shinde) गटाने स्वतःच्या एजंसीकडून सर्व्हे करून आपले आकडे पुढे आणले. त्याच्या पाच ते सहा दिवसानंतर भाजपने (BJP) सर्व्हे केला. त्यामध्ये त्यांचे आकडे पुढे आले. आपल्याच एजंसी लावून आपलाच उदो उदो करून घ्यायचा आणि जनतेची दिशाभूल करायची, असा हा सर्व प्रयत्न असल्याचे आमदार देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT