Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh News : माजी गृहमंत्री का म्हणाले, आरोग्यमंत्र्यांना नारळ द्या? नांदेडमधील घटनेवरून वाक् युद्ध पेटले !

Atul Mehere

Nagpur Political News : नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा चोख आहे, असा दावा सत्ता पक्षाकडून केला जात आहे. त्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. (The health system in the state has completely collapsed)

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या अक्षम्य दुर्लक्षप्रकरणी सरकारने दोषी अधिकाऱ्यांवर तर कारवाई करावीच, परंतु आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून आरोग्यमंत्र्यांना प्रथम मंत्रिमंडळातून नारळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे ठाण्यातही निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या घटनेच्या दुर्दैवी स्मृती ताज्या असतानाच नांदेड जिल्ह्यामध्ये २४ रुग्णांचा बळी जाणे ही साधी बाब नाही, असे देशमुख यांनी नमूद केले आहे.

राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आल्यापासून आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. कोविड काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने आपत्कालीन परिस्थितीचा उत्कृष्टपणे सामना केला. परंतु सध्याच्या सरकारला सर्वकाही सुरळीत असलेली आरोग्य यंत्रणाही सांभाळता येत नसल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली. या घटनेवरून त्यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले.

सध्याच्या सरकारने सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याच्या नावाखाली 'आपला दवाखाना' सुरू केला आहे. परंतु या दवाखान्यांमध्ये मनुष्यबळ आणि औषध साठाच नसेल, तर अशा शोभेच्या वास्तूंचा काय उपयोग. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी. दोषी अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्यमंत्र्यांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी अनिल देशमुख यांनी केली.

अकोल्याच्या सुपर स्पेशालिटीचे काय?

कोट्यवधी रुपये खर्च करून अकोला शहरात उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या धुळीच्या थरात माखले आहे. मनुष्यबळ आणि औषध साठाच नसल्याने येथील रुग्णसेवा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या इमारतीमध्ये पुरेशा अत्याधुनिक यंत्रसामग्रीचाही अभाव आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस सात ऑक्टोबरला अकोल्यात आणखी काही रुग्णसेवेचा शुभारंभ करणार आहेत. परंतु मनुष्यबळ आणि औषधसाठा उपलब्ध नसेल तर अशा सुविधांचा उपयोग काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT