Eknath Shinde, Vidarbha
Eknath Shinde, Vidarbha Sarkarnama
विदर्भ

शिंदेंचे सुमारे ५० दूत विदर्भात दाखल, शिवसैनिकांना देताहेत विविध ऑफर !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसेनेला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात विदर्भात (Vidarbha) दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असून याकरिता चांगल्या पदांची ऑफरही दिली जात आहे. या संदर्भात नुकतीच उमरेड रोडवरील पांडव कॉलेज येथे बैठकसुद्धा घेण्यात आली.

पांडव कॉलेज येथील बैठकीला रामटेक (Ramtek) विधानसभा मतदारसंघ तसेच ग्रामीण भागातील बरेच पदाधिकारी उपस्थित होते असे समजते. शहरातील काही पदाधिकाऱ्यांनासुद्धा बैठकीला बोलावण्यात आले होते. काही दूत त्यांच्यासोबच सकाळीच चर्चेसाठी पाठवण्यात आले होते. शिवसेनेच्या (Shivsena) त्या बारा खासदारांमध्ये राटमेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा समावेश असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सेनेला भगदाड पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

म्हणजे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यापूर्वीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत नेले आहे. यानंतरही मूळ शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून कुठलेही ऑपरेशन होत नसल्याने निष्ठावंत हतबल झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत राहायचे की उद्धव ठाकरे यांच्या सोबत, या विचाराने अनेक शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत.

पांडव यांच्यावर जबाबदारी..

शिंदे समर्थकांचा सुमारे ५० जणांचा गट विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेला आहे. नागपूरची बैठक आटोपल्यानंतर सोमवारी गडचिरोली येथील हॉटेल वैभव येथे बैठक घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील बरेचसे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते, असे समजते. एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील खास दूत किरण पांडव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे समजते. शिंदेंसोबत आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीच्या हॉटेलवर ते पूर्णवेळ सोबत असल्याचीही माहिती आहे. पांडव यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनाही भेटायला रविवारी सकाळी ठाण्यातील काही लोक येऊन गेले. शिवसेनेत आता काही ठेवले नाही, त्यापेक्षा आमच्यासोबत या. तुमचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ऑफर त्यांना दिल्याचे समजते. मात्र कुमेरिया यांनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे कळते. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांसोबत शिंदे गटाने संपर्क साधला असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका नेत्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT