Sanjay Rathod at Yavatmal. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : मोदींच्या सुरक्षा ताफ्यासाठी येणार 700 इनोव्हा कार

सतीश हरिश्चंद्र येटरे

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. 28), फेब्रुवारी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहरानजीक भारी येथील मैदानावर बचत गट महिलांचा मेळावा होणार आहे. त्यासाठी 26 एकरांवर भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. या मेळाव्याला दीड लाखाहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिस आणि विविध सुरक्षा संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिमतीला 700 शासकीय इनोव्हा कार बोलविण्यात आल्या आहेत. या कार महाराष्ट्रासह विविध राज्यांतून यवतमाळमध्ये मागविण्यात आल्या आहेत. मोदींच्या सभेसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री राठोड यांनी भारीच्या मैदानावर पोहोचले. याशिवाय त्यांनी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. बैठकीला खासदार भावना गवळी, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्याच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे विविध 30 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याद्वारे मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवास सुविधेसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचाही यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. भारी येथील 42 एकरांच्या खुल्या जागेत या मेळाव्याचे नियोजन आहे. 26 एकरांवर मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. मेळाव्याला येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यासाठी बसनिहाय समन्वयक व तालुकास्तरावर संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. य व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चोख सुरक्षेची व्यवस्था स्थानिक पोलिस आणि विविध ठिकाणांहून बोलाविण्यात आलेल्या सुरक्षा संस्था करीत आहेत.

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. यवतमाळ दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने काही योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. याशिवाय बचत गटांच्या महिलांचा हा मेळावा असल्याने त्यांच्यासाठीसुद्धा काही योजना घोषित करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT