MSEB farmers
MSEB farmers Sarkarnama
विदर्भ

निवडणुकीचा निकाल लागताच, सरकारने लावला शेतकऱ्यांचा ‘निक्काल’

Abhijeet Ghormare

भंडारा : निवडणुकीच्या निकाल लागताच सरकारने भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) चांगलाच शॉक दिला असून थकित वीजबिलापोटी कनेक्शन कापण्याचा सपाटा लावल्याने निवडणुकीचा निकाल लागताच सरकारने (State Government) शेतकऱ्यांचा ‘निक्काल’ लावल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे.

निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी थकित बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात झाली आहे. 20 जानेवारी ते 23 जानेवारी या 4 दिवसांत एकूण 173 वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. विशेष म्हणजे या 173 कनेक्शन पैकी 135 कृषी पंपाचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे भंडारा वीज वितरण विभागाला केवळ निवडणूक होईपर्यंत थांबायचे होते का किंवा निवडणूक होईपर्यंत त्यांना थांबविले होते का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी सत्ता पक्षातील लोकांना विचारत आहेत. ऐन रब्बी हंगामात भंडारा विद्युत वितरण विभागाकडून कृषी पंपाची वीज कापण्यास सुरुवात झाली असून कृषी पंपाची वीज कापली गेल्याने यंदाच्या हंगामात शेतीला पाणी कसे द्यायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे निवडणूक संपल्यावर आपला वाली कोणी नाही, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 19 जानेवारीला पार पडली. सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांना भूल थापा दिल्या. आपणच शेतकऱ्यांचे खरे वाली असल्याच्या बनाव सर्वच पक्षांनी केला. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी सामान्य लोकांसह शेतकऱ्यांचे हात पाय जोडून त्यांचे अमूल्य मतदान मागून निवडणुकीत आपल्या पदरी जागा पाडून घेतल्यानंतर कोण शेतकरी, असे म्हणून चक्क त्यांच्या कृषी पंपांची वीज कापण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार करता एका महिन्यात 1 हजार 823 शेतकऱ्यांची वीज कापली गेली आहे. त्यातही शेतकऱ्यांची थट्टा करणारी बाब म्हणजे 19 जानेवारीला भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निकाल लागताच 20 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत 4 दिवसांत 135 शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे.

21 जानेवारी ते 23 जानेवारी या 4 दिवसांची कृषी पंपांची वीज कापण्याची तालुकानिहाय आकडेवारी बघता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते म्हणवून घेणारे आमदार नाना पटोले यांच्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 74 कृषी पंपांचे कनेक्शन कापण्यात आले आहे. यात लाखांदूर तालुक्यात 15, लाखनी येथे 57 व साकोली येथे 2 असे 74 कृषी पंपांचे कनेक्शन निवडणुकीचा निकाल लागताच कापण्यात आले आहे. त्यात दुसरा नंबर राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांचा लागला असून त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील मोहाडी येथील 31 तर तुमसर येथील 11, असे 42 कृषी कनेक्शन निवडणुकीच्या निकालानंतर कापण्यात आले आहेत. यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हेसुद्धा सुटले नसून त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील भंडारा येथील 4 व पवनी येथील 15 असे एकूण 19 कनेक्शन निवडणुकीच्या निकालानंतर कापण्यात आले आहेत. यात विशेष बाब अशी की या संबंधित विभाग हे कनेक्शन कापत असताना विरोधी पक्षसुद्धा कुठे दिसला नाही. त्यामुळे शेतकरी एकंदरीतच राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलू लागले आहेत.

आम्ही मतदानापुरतेच उरलो का ?

निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना जी वागणूक देण्यात आली, त्याचा ओबीसी क्रांती मोर्चाने तीव्र शब्दांत निषेध केला असून आम्ही निवडणुकीपुरतेच उरलो आहोत का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. लवकरात लवकर तोडलेले वीज कनेक्शन न जोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT