BJP MLA Sameer Meghe Sarkarnama
विदर्भ

Sameer Meghe : आमदार मेघेंच्या पराभवासाठी आघाडीचे ‘मायक्रो प्लॅनिंग’; निवडणुकीपूर्वीच 30 हजार मते कापणार?

Rajesh Charpe

Nagpur : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपचे हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांची महाविकास आघाडीने सुमारे 30 हजार मते कापली आहेत. या मतदारसंघातील बोगस मतदारांची यादीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केली आहे. ही सर्व नावे वगळण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत हिंगण्यामधून महायुतीचा उमेदवारही 17 हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर होता.

हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आपसातील भांडणे, मतभेद, गटबाजीमुळे मेघे यांचे दोन वेळा चांगलेच फावले. भाजपचे आमदार विजय घोडमारे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा रिकामी केली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन घोडमारे त्यांच्याच विरोधात लढले होते.

महाविकास आघाडीमुळे येथील चित्र सध्या बदलले आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला येथून आघाडी मिळाली असल्याने अनेक इच्छुकांचा आशा उंचावल्या आहेत. याशिवाय कुठल्याही परिस्थितीत भाजपला मदत करायची नाही, असा निर्धार काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान आमदार मेघे यांनी केलेले वक्तव्य माजी मंत्री सुनील केदारांनी चांगलेच मनावर घेतले आहे. त्यांनी मेघे यांना उघड आव्हान दिले आहे. हिंगण्यामध्ये जाहीर सभेत केदारांनी हिंगण्याची निवडणूक आपण बघणार असले जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगणा मतदारसंघाच्या मतदार यादीतील घोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर काढला आहे. येथील मतदार याद्यांमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त दुबार मतदार आणि 30 हजारांपेक्षा जास्त बाहेरील बोगस मतदारांची नावे त्यांनी उघड केली आहे. हे बघता महाविकास आघाडी बारकाईने निवडणुकीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येते.

मेघे यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये नोकरीला असलेले कर्मचारी, त्यांचे नातेवाईक, वर्धेतील कॉलेजचे कर्मचारी, नातेवाईक, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, वसितगृहांमध्ये राहणाऱ्या इतर राज्यातील विद्यार्थ्यांची नावे मतदारयादीत समावेश केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांची नावे टाकण्यात आली असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बाहेरच्या मतदारांची नावे वगळण्याची मागणीही केली आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभेच्या निवडणुकीत समीर मेघे हे 47 हजार मतांनी निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT