नागपूर : आपल्या राज्यातील युवकांना रोजगाराची गरज असताना वेदांतासारखा प्रकल्प गुजरातमध्ये जाणे दुर्दैवी आहे. ईडी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकल्प आपल्या हातातून गेला आहे. हे सरकार असेच करत राहिले तर महाराष्ट्राचा विकास कसा होणार, असा सवाल माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केला.
नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारमुळे (Mahavikas Aghadi Government) वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. याबाबत विचारले असता आमदार ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्यासोबत एकनाथ शिंदेही होते. त्यामुळे महाविकास आघाडीमुळे हा प्रकल्प गेला, असे त्यांनी म्हणण्यात काय अर्थ आहे? उलट महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सुरुवात झाली होती.
शिंदे - फडणवीस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राला गमवावा लागला. यांच्या राज्यात असेच सुरू राहिले तर राज्याचा विकास होणार कसा? केंद्र सरकारचा सगळा फोकस अहमदाबादवर आहे. त्यांच्या सोबतीला राज्य सरकारसुद्धा तिकडेच फोकस करीत आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचासुद्धा त्यांचा कट आहे. या सर्व प्रकाराचा आम्ही निषेध करतो, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, असे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली जबाबदारी झटकत आहेत. जे झाले ते चुकीचे झाले आहे. त्या सगळ्या गोष्टी जपता आल्या असता. महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करता राजकारणाच्या पलीकडे आपण गेले पाहिजे. तेव्हा कुठे राज्याचे हित साधले जाऊ शकेल. पण या सरकारकडून तशी अपेक्षा करता येईल, असे वाटत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. पण त्या चर्चेबद्दल काय बोलावे, हेच आता कळत नाहीये. पंतप्रधान चर्चा करतात, महाराष्ट्रात येऊन राजकारण करतात. पण महाराष्ट्राला काही देत नाही, असा घणाघाती आरोप आमदार ठाकूर यांनी केला. जे काही मुंबई आणि महाराष्ट्रात आहे, ते त्यांना अहमदाबादमध्ये हालवायचे आहे. त्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे, असेही आमदार ठाकूर म्हणाल्या.
खासदार नवनीत राणांनी उपचार करून घ्यावे..
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. खासदार राणांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत विचारले असता, त्या भ्रमिष्ट झालेल्या आहेत. स्वतःवर उपचार आता त्यांनीच करून घ्यावे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.