sakoli grampanchyat Bhandara
sakoli grampanchyat Bhandara  
विदर्भ

दारुच्या नशेत झिंगलेल्या ग्रामसेवकाची सभेत हजेरी; पहा video

सरकारनामा ब्युरो

भंडारा : पोलिस स्टेशनमध्ये दारुची पार्टी करणाऱ्या पोलिसांचा एक व्हिडीओ गेल्या आठवड्या व्हायरल झाला होता. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठांना पोलिसांनी दारुच्या नशेत धक्काबुक्की केल्याचा प्रकार नाशिकमधील (Nashik) गंगापूर पोलीस ठाण्यात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतही (Grampanchayat) असाच प्रकार आढळून आला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक (Gramsevak) दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळत पडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ऐन सभेतच ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध होऊन पडल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि वरिष्ठांकडे संबंधित ग्रामसेवकाची तक्रार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील विरसी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (२९ मार्च) सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीची सभा बोलवली होती. मात्र ऐन सभेत ग्रामसेवक हेमंत पब्बेवार दारू पिऊन आले. ते इतके दारु प्यायले होते की सभेत खुर्चीवर बसल्या- बसल्याच लोळू लागले आणि त्यातच ते बेशुद्ध झाले.

ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांंनी पब्बेवार यांना उठविण्याचा प्रयत्न केला. पण, ते इतके नशेत होते की ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकाऱ्यांना सभा रद्द करावी लागली. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यांची वरिष्ठाकडे तक्रार केली. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. आता दारुड्या ग्रामसेवकाची हकालपट्टी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT