Atul Bhatkhalkar and Nitin Raut
Atul Bhatkhalkar and Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

अतुल भातखळकरांनी काढली ऊर्जामंत्र्यांची अक्कल...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव दर दिवशी एक नवा विक्रम गाठत आहेत. त्यावर टिका करताना केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एक ट्विट केले. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ऊर्जामंत्र्यांची अक्कल काढली.

आज सकाळपासून भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. तिकडे भंडाऱ्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘भाजपची काळी जादू चालणार नाही’, असे म्हणत भाजप नेत्यांना डिवचले तर त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी भीतीपोटी ते तसे बोलत असल्याचे सांगितले. इंधन दरवाढीवरून महाविकास आघाडीतील नेते दररोजच भाजपवर तोंडसुख घेत आहेत.

२०१४ मध्ये गॅसचा दर ४१० रुपये होता. तेव्हापासून आतापर्यंत हा दर वाढत जाऊन ९५० रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या ७ वर्षांत गॅसचा दर ६४० रुपयांनी वाढला. याचे श्रेय घेण्यासाठी ते कधीच समोर येणार नाहीत, असे नितीन राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याला उत्तर देताना ‘९५० वजा ४१०, याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत (Nitin Raut) साहेब? विजेची बिलं अशाच मनमानी बेरजा वजाबाक्या करून भरमसाठ पाठवायची सवय लागली आहे तुम्हाला, आधुनिक भास्कराचार्य’, असे म्हणत आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी डॉ. नितीन राऊतांची अक्कल काढली आहे. प्रत्यक्षात ९५० वजा ४१० केले तर ५४० होतात. नेमकी हीच चूक काढून भातखळकरांनी ऊर्जामंत्र्यांवर जळजळीत टिका केली.

भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये रोजच आरोप-प्रत्यारोप होत असतात. राज्यातील जनता आता त्याला कंटाळली आहे, तर काही लोक त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून बघतात. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यावर उपाययोजना करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तर यामध्येही एकमेकांना कमी कसे लेखता येईल आणि एक दुसऱ्यांच्या चुकांवर कसे बोट ठेवता येईल, याकडेच नेत्यांचे लक्ष अधिक आहे. भाजपचा विरोधक म्हणूनही कॉंग्रेस अपयशी ठरल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत.

एके काळी भाजप विरोधी पक्ष असताना इंधन दरवाढीवर त्यांनी देशभर रान उठवले होते. दररोज मोर्चे काढले जात होते. तत्कालीन केंद्र सरकारचा तीव्र विरोध होत होता. आंदोलनामध्ये जनतेचाही भक्कम पाठिंबा भाजपने मिळवला होता. पण सद्यःस्थितीत विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरला नाही. एक दोन सायकल मोर्चे सोडले तर इंधन दरवाढीच्या विरोधात पाहिजे तशी आक्रमकता कॉंग्रेसमध्ये दिसत नसल्याचेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT