Eknath shinde, Atul Londhe and Devendra Fadanvis
Eknath shinde, Atul Londhe and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ, सर्वत्र अंधेर नगरी, चौपट राजा !

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः आम्ही सत्तेत आल्यास हे करू, ते करून दाखवू, अशा बाता मारणारे सरकार स्थापन केल्यावर मात्र गप्प बसले आहेत. महाविकास आघाडी सरकारचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावरही सरकार बोलायला तयार नाही. अंधेर नगरी, चौपट राजा, अशी आजची स्थिती झाली असल्याची खरमरीत टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राज्यात शिंदे- (Eknath Shinde) फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पहात आहे. राज्यात (Maharashtra) मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झाले, तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात अस्तित्वातच नसल्याने महाराष्ट्र अनाथ झाला आहे, असा आरोप लोंढे (Atul Londhe) यांनी केला.

या संदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात सत्तांतराच्या नाट्यानंतर भाजपाप्रणित सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांच्याकडे कोणतेही खाते नाही. मुख्यमंत्री कार्यालयातही अजून प्रशासन व्यवस्था नाही. मागील १५ दिवसांत शिंदे-फडणवीस या दोघांचेच सरकार असून महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करून जुन्या भाजप सरकारचेच निर्णय पुढे रेटण्याचा सपाटा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच या सरकारने राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळण्याऐवजी मुंबईकरांच्या जिवावर बेतणाऱ्या आरे कारशेडचा निर्णय घेतला.

सरपंच, नगराध्यक्ष यांची थेट निवडीचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेले निर्णय पुन्हा लागू करण्याचे काम सुरू आहे. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वदूर पाऊस झाला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जनतेला तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. पण मुख्यमंत्री कॅमेरा, ॲक्शनमध्ये अडकून व्हिडीओजीवी झाल्याचे दिसत आहे. सत्तेवर येताच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या बाता मारणारे लोक आता सत्तेत आले, पण कोर्टात व्यवस्थित बाजूही मांडू शकले नाहीत. जे मध्य प्रदेशला जमले ते महाराष्ट्राला का जमत नाही, असा प्रश्न विचारणारे आता मात्र गप्प आहेत. राज्यातील आत्ताची परिस्थिती ही ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ अशी झाल्याचे अतुल लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT