Avishkar Vijay Rahangadale, Tiroda Gondia.
Avishkar Vijay Rahangadale, Tiroda Gondia. Sarkarnama
विदर्भ

अविष्कार आमचा हिरा, होता आनंदाचा झरा; आमदार रहांगडालेंच्या पोस्टने हळहळली मने...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे (BJP) आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सेलसुरा येथे झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. सावंगी येथील दत्ता मेघे (Datta Meghe) वैद्यकीय महाविद्यालयात तो वैद्यकीय शिक्षण घेत होता. अविष्कारचे वडील आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangadale) यांनी पुत्रविरहात सोशल मिडियावर एक कविता पोस्ट केली आहे. ती कविता वाचल्यावर डोळ्यांतून अश्रू येणार नाही, असा एखादाच…

सावंगी मेघे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला अविष्कार हुशार आणि मनमिळाऊ होता. त्याच्या खमारा या गावात डॉक्टर नसल्यामुळे आपण डॉक्टर होऊन गावकऱ्यांची सेवा करायची, हा ध्यास त्याने घेतला होता. त्यासाठी तो जोरदार तयारी करीत होता. घटनेच्या दिवशी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ७ जण यवतमाळला गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून सर्वजण कारने परत येत होते. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार नदीत कोसळली आणि सातही जण जागीच ठार झाले. ही घटनेची माहिती पसरताच ऐकणारे सुन्न झाले. या मुलांच्या आईवडिलांवर आता काय आभाळ कोसळणार, या विचाराने लोकांचे डोळे पाणावले होते.

आमदार रहांगडाले यांनी लिहिलेली कविता...

आज काळीज फाटलं,

त्यानं आकाश गाठलं;

अविष्कार आमचा हिरा,

होता आनंदाचा झरा;

डॉक्टर नव्हते खमारी गावात,

होती खंत आणि हुरहुर आमच्या मनात;

बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,

गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;

लागली कुणाची नजर,

आज दगडालाही फुटली पाझर;

गेला तरुण वयात सोडून,

केलेले सारे वादे तोडून;

तुझी आई आजही वाट पाही,

तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;

कसे समजवू तिला,

तू परत येणार नाहीस मुला;

कुठे हरवलास पाखरा,

परत ये रे आमच्या लेकरा;

गेलास अविष्कार आम्हाला सोडून,

तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून

आज आहे मातम सगळीकडे,

आई बाबा संगे सारा गाव ही रडे.

चि. अविष्कार यास अश्रूपूर्ण श्रद्धांजली...!

आमदार विजय रहांगडाले यांचे खमारा हे गाव आजही शोकसागरात बुडाले आहे. घटनेच्या दिवशी तर गावात चुलीही पेटल्या नव्हत्या. अविष्कारच्या वडिलांनी आज पोस्ट केलेली कविता वाचणाऱ्यांच्या डोळ्यांतूनही अश्रुधारा बरसत होत्या. ऐन उमेदीत तरुण मुलाचे जाणे काय असते, याची कल्पनाही करवली जात नाही. पण रहांगडाले कुटुंबीयांवर तर प्रत्यक्ष ही परिस्थिती आली आहे. हे बघून प्रत्येक जण हळहळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT