Ayush Suradkar's Letter to Ravikant Tupkar. Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar : चिमुकल्या आयुषचं रविकांत तुपकरांना पत्र आणि दोन हजार रुपयेही

Protest For Farmer : सोयाबीनला भाव मिळावा यासाठी दिवाळीचा खाऊ दिला एल्गार यात्रेला

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची एल्गार यात्रा सध्या सुरू आहे. तुपकर यांच्या या यात्रेला शेतकरी, शेतमजुरांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. परंतु बुलडाणा जिल्ह्यातील एका चिमुकल्यानं या यात्रेला असा प्रतिसाद दिला की, तुपकर यांच्यासह यात्रेतील अनेकांचे डोळे पाणावले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथुन तुपकर यांची एल्गार यात्रा सुरू झालीय. संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा फिरणार आहे. अशात मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख गावातील चिमुकल्यानं तुपकर यांना पत्र पाठवलय.

तुपकर यांची एल्गार यात्रा नायगाव देशमुखमध्ये पोहोचल्यानंतर तेथे एका सभेला त्यांनी संबोधित केलं. तुपकर यांचं भाषण ऐकल्यानंतर गावातील चवथ्या वर्गात शिकणारा आयुष गोपाल सुरडकर हा चिमुकला चांगलाच भारावला. (Ayush Gopal Suradkar From Buldhana Wrote Emotional Letter To Ravikant Tupkar & Transferred Two Thousand Rupees for Protest)

रविकांत तुपकर यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे एकंदरीत भाषण या दोन्ही बापलेकांना मोठे प्रभावित करून गेलं. घरी आल्यावर आयुषनं रविकांत तुपकर यांना भावनिक पत्र लिहिलं. ‘मला यंदा दिवाळीला नवीन कपडे आणि खाऊ नको. आपल्या सोयाबीनला भाव हवा आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावासाठी लढणारे रविकांतभाऊ तुपकर यांच्या एल्गार मोर्चासाठी मी पैसे देणार आहे. रविकांतभाऊ तुम्ही सरकारच्या धोरणाविरोधात लढा आणि आमच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या’ अशी भावनिक साद घालणारं पत्र आयुषनं तुपकर यांना पाठवलय.

आयुषनं वडिलांकडुन दोन हजार रुपये घेतले व ते रविकांत तुपकर यांना एल्गार यात्रेसाठी पाठवले. ‘माझ्या वडिलांकडे चार एकर शेती आहे. यावर्षी आमच्याकडे पाऊस कमी पडल्यामुळे चार एकरात १३ पोते सोयाबीन झाली. दरवर्षी माझे बाबा मला दिवाळीला नवीन कपडे आणि खाऊ आणतात. यावर्षी कपडे आणि खाऊ घेण्यासाठी त्यांनी चार एकर सोयाबीन मार्केटला विकायला नेली. मी त्यांच्यासोबत होतो, माझ्या बाबांनी दिवस रात्र कष्ट करून, मेहनत करून पिकवलेल्या सोयाबीनला ४ हजार ३५० रुपये भाव मिळाला. तो भाव माझ्या बाबांनी ठरवला नाही, दुसरे लोक आले त्यांनी भाव ठरवला आणि सोयाबीन घेऊन गेले. मी बाबांना विचारले की सोयाबीन तुम्ही पिकवले तर तुम्ही भाव का ठरवला नाही, तर बाबा म्हणाले बाळा तू अजून लहान आहे सरकारचे धोरण तुला कळणार नाही’, असं आयुषनं पत्रात लिहिलय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयुष पुढं म्हणतो, ‘ते पैसे घेऊन आम्ही नवीन कपडे घेण्यासाठी दुकानात गेलो. पण दुकानात गेल्यावर मी बाबांना म्हटले. यावर्षी मला नवीन कपडे न घेता त्या कपड्याचे पैसे मला द्या. मी ते पैसे तुमच्या सोयाबीन- कापसाच्या भावासाठी लढणाऱ्या रविकांतभाऊ तुपकर यांना देणार आहे. ते आपल्याला भाव मिळवून देतील. सरकारसोबत भांडतील व कोणते धोरण आहे ते बदलतील. त्यामुळे मी हे पैसे तुम्हाला पाठवत आहे.’ सोयाबीनला भाव मिळवून देण्याचं आवाहन तुपकर यांना करीत आयुष लिहितो ‘रविकांतभाऊ तुम्ही माझ्या बाबांच्या सोयाबीनला भाव मिळवून द्या, माझ्या कपड्याचे व खाऊचे पैसे मी तुम्हाला २० तारखेच्या सोयाबीन-कापूस एल्गार मोर्चासाठी पाठवत आहे. सोयाबीनचे भाव वाढले की मी नवीन कपडे घेईल व तुम्हाला भेटायला येईल.’

चिमुकल्या आयुषचं हे पत्र आणि त्यानं पाठवलेले पैसे तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांना मिळाले. हे पत्र वाचल्यावर शर्वरी तुपकर यांचे डोळेही पाणावले. त्यांनी तातडीनं आयुषला फोन केला. गोपाल सुरडकर यांना २००१ रुपये परत पाठवले. चिमुकल्याच्या या पत्रामुळं आपलं बळ वाढलय असं रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. आयुष प्रमाणेच साखळी बुद्रूक गावातील गायत्री देशमुख या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीनंही तुपकर यांच्या आंदोलनासाठी १० हजार रुपयांची मदत केलीय. त्यामुळं तुपकर या लढ्यात एकटे नाहीत, असा संदेश गावागावातून त्यांना मिळतोय.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT