Balasaheb Thorat, Radhakrishna vikhe patil sarkarnama
विदर्भ

Maharashtra Winter Session 2023 : कंत्राटी तहसीलदार भरतीची माहिती महसूलमंत्र्यांनाच नाही!

Pradeep Pendhare

Nagpur : माजी महसूलमंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे, अशी जाहिरात वृत्तपत्रात छापून आली असून, ती संबंधित मंत्र्यांना माहित नाही. मग हे राज्य कसे चालणार, अशी टीका आमदार थोरात यांनी केली. कंत्राटी भरतीवरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंना आमदार थोरात यांनी सभागृहात घेरण्याचा प्रयत्न केला.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जाहिरात प्रसिद्ध केली होती. तहसीलदार, नायब तहसीलदार, संगणक चालक, कारकून, लिपीक आणि शिपाई यांच्या रिक्त जागा फक्त सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असून, त्यासाठी अर्ज करा, अशी ही जाहिरात होती. या जाहिरातीवरून राज्यात चांगलाच गदारोळ झाला होता. राज्यातील विरोधकांनी महसूल विभागावर तोंडसुख घेतले. यानंतर महसूल विभागाने ही जाहिरात रद्द केली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत तशी घोषणा केली. या भरतीवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. महसूल विभागाला या जाहिरातीवरून चांगलेच फटकारले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. यावरून गदारोळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती नाकारली गेली. मंत्री यावर म्हणतात, मला माहित नाही. असे कसे होऊ शकते. तहसीलदारासारखे महत्त्वपूर्ण पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असेल, तर राज्य कसे चालणार आहे. जाहिरात दिली हे मंत्र्यांना कसे माहित नाही. यावरून राज्य सरकार कसे चालले याचे हे स्वरूप दिसते आहे. राज्य कसे चालले आहे हे दिसते आहे आणि या राज्यातील विभाग कसे चाललेत दिसते".

आमदार बाळासाहेब थोरात कंत्राटी तहसीलदार भरती विषय मांडत होते आणि मंत्र्यांनी ही जाहिरात माहित नसल्याचे सांगत होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असते, तर हे सर्व स्वरुप त्यांच्या लक्षात आले असते. राज्यात वाळू धोरण, तलाठी भरतीचा बट्ट्याबोळ झाला हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले असते, असे ही आमदार थोरात म्हणाले. या धोरणाला आमचा विरोध असल्याचेही आमदार थोरात यांनी म्हटले.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT