<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>

Nana Patole

 

Sarkarnama

विदर्भ

यापेक्षा बॅंडवाले चांगले नियोजन करतात, राष्ट्रवादीने केला पटोलेंचा हिशेब चुकता?

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार चांगलाच आपटला. त्यानंतर ही निवडणूक आमच्या स्ट्रॅटिजीचा भाग होता, अशी पळवाट काढणारी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी (Nana Patole) दिली होती. पण ‘राष्ट्रवादीचे विदर्भातील दुकान बंद पाडणार’, हे वक्तव्य पटोंलेंना भोवले, असे काहीसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या (NCP Leaders) प्रतिक्रियांतून वाटते आहे. ‘कॉंग्रेसने जी स्ट्रॅटिजी वापरली त्यापेक्षा बँडवाले चांगले नियोजन करतात’ अशी झोंबणारी टीका राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर (Baba Gujar) यांनी केली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानातून राष्ट्रवादीने आपला हिशेब चुकता केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी ‘नाना पटोले यांचे दुकान बंद झाले’ अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनीसुद्धा कुंटे पाटील यांचीच री ओढली. कॉंग्रेसपेक्षा बॅंडवाले चांगले नियोजन करतात, असे जिल्हाध्यक्ष गुजर यांनी म्हटले. काँग्रेसने उमेदवार बदलाबदलीचा घोळ घातला. एकूणच पटोलेंच्या ‘दुकान बंद’ या वक्तव्याचा काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसल्याचे दिसून येते.

विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार आपटल्यानंतर ‘आता कुणाचे दुकान बंद झाले?’ अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उमटल्या. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हिशेब चुकता करायचे आधीच ठरवले होते, असे संकेत या प्रतिक्रियांमधून मिळत आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीची सुमारे साठ मते फुटल्याचा अंदाज वर्तविला जात असून आता राष्ट्रवादीकडे संशयाने बघितल्या जात आहे.

महाविकास आघाडीच्यावतीने सुरुवातीला रवींद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर सुमारे बारा ते पंधरा दिवस भोयर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधला नाही. राष्ट्रवादीकडे २५ मते असतानाही त्यांनी एकाही मतदाराची भेट घेतली नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. ‘काँग्रेसला कदाचित आमच्या मतांची गरज नसावी’, अशा प्रतिक्रियांही उमटल्या होत्या. तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकान बंद करणार’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्यांचा रोख राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्यावर होता. पटेल आणि पटोले शेजारी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूकसुद्धा लढली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असताना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना पराभूत केले होते. पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. याबाबत त्यांना छेडले असता पवार यांनी पटोले यांच्या काँग्रेस निष्ठेवरच प्रश्न उपस्थित केला होता. ते यापूर्वी भाजपातून लढले आहेत. त्यामुळे त्यांची वैचारिक बांधीलकी वेगळी असावी, असा शालजोडीतील टोला पवार यांनी लगावला होता. ‘दुकान बंद’ हे वक्तव्य राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले होते. रवींद्र भोयर यांना नाना पटोले यांनीच भाजपमधून आयात केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT