Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Bawankule On Thackeray's Statement: माझं कूळ काढून त्यांनी माझा नव्हे, तर तमाम ओबीसींचा अपमान केला !

Balasaheb Thackeray : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुळाचा अपमान केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी वारंवार माझ्या आडनावावरून टिका केली आहे. सावरकरांच्या विषयात सातत्याने नौटंकी करून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुळाचा त्यांनी अपमान केला आहे आणि माझा कूळ काढून त्यांनी केवळ माझाच नाही, तर तमाम ओबीसी बांधवांचा अपमान केला आहे, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (The clan of Hindu heart emperor Balasaheb Thackeray has been insulted)

मालेगावच्या सभेत एकशे बावन कुळे आले तरी काही फरक पडत नाही असे ते म्हणाले. ओबीसींचा अपमान भविष्यात त्यांना भोगावा लागेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे उद्धव ठाकरे नेमके काय करणार, असा सवाल आमदार बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ठाकरेंना सावरकरांविषयी खरोखरच आदर असेल तर त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याची हिंमत दाखवावी, अन्यथा आम्ही हिंदुत्व सोडले हे तरी जाहीर करावे, असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार अनिल सोले, डाॅ. मिलिंद माने, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिए, धर्मपाल मेश्राम,अर्चना डेहनकर, दयाशंकर तिवारी, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे खोटारडे आणि ‘नौटंकी‘ आहेत. मालेगावच्या सभेत त्यांनी आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे सांगितले. मात्र तीन वर्षांपासून राहुल गांधी सातत्याने सावरकरांचा अपमान करीत आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात येऊन सावरकर यांचा अपमान केला होता. तेव्हा ते का शांत बसले होते, हे कळायला मार्ग नाही.

कदाचित त्यांना पुन्हा काँग्रेसच्या बळावर मुख्यमंत्री व्हायचे असेल आणि आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायचे असेल म्हणूनच ते काही बोलत नसावे. त्यांचा हा ढोंगीपणा आम्ही सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यत घेऊन जाणार आहोत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आपल्या हयातीत कधीच सावरकर यांचा अपमान सहन केला नाही. तत्कालीन काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारण्यास त्यांनी मागेपुढे बघितले नाही. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार सावरकरांचा अपमान होत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. जाहीर भाषणांमध्ये सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशा वल्गना करायच्या आणि आतून अपमान करणाऱ्यांसोबत राहायचे हा दुटप्पीपणा उद्धव करीत आहे.

ते किती काळ सावरकर यांचा अपमान सहन करीत राहणार आहेत. त्यापेक्षा काँग्रेसच्या जोखंडातून बाहेर का पडत नाही, कोणाच्या आदेशाची वाट बघत आहेत, असा सवालही पत्रकार परिषदेत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT