Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule  Google
विदर्भ

Bawankule On Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली काँग्रेस, राष्ट्रवादीची वकिली; बावनकुळेंनी उडवली खिल्ली !

Atul Mehere

Nagpur Political News : उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे रडणं होत. उद्धव ठाकरे 'इंडिया' आघाडीत गेले तेव्हापासून ते काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वकील झाले आहेत. शरद पवारांच्या विचारांवर काम करणार, अशी शपथ त्यांनी घेतल्याचे दिसत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Eknath Shinde was mentioned as Marda Maratha)

नागपुरात बुधवारी (ता. २५) प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचा समाचार घेतला. 'मी मागे विचारले होते, स्टॅलिन सोबत राहणार का?' या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. काँग्रेस आणि शरद पवारांच्या विचारावर काम करेल, हे काल त्यांनी आपल्या भाषणातून पुन्हा सांगितलं.

जेव्हा कोणते विकासात्मक मुद्दे नसतात, तेव्हा मोदी, संघावर टीका करायची. इतके दिवस त्यांचा पक्ष संघाच्याच विचारधारेवर चालत होता, आता काय झालं. संघामुळे देशाची संस्कृती कशी वाचेल, हे सांगणारे ठाकरे आता संघाच्या विरोधात बोलतात, याबद्दल आश्चर्य वाटते, असे मत आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केले.

स्टॅलिन किती चांगले, राहुल गांधी किती चांगले हेच सांगणारं उद्धव ठाकरे यांचं भाषण होतं. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नवीन प्रवक्ते उद्धव ठाकरे झाले आहेत. ते फडणवीस, मोदी यांच्यावर टीका करतात. त्यामुळे त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या युतीशी बेईमानी करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद मिळवलं. मात्र, त्यांना त्यांचं पाप इथेच फेडावं लागलं. शेवटी एकनाथ शिंदेंसारखा मर्द मराठा समोर आला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, असाही टोला त्यांनी लगावला.

नीलेश राणे सच्चे कार्यकर्ते...

नीलेश राणे चांगले कार्यकर्ते आहेत. काही वेळेला एखादी घटना घडते, त्यामुळे निराशा येते. नीलेश समाजाचा ध्यास असणारे नेते आहेत. नीलेश राणे यांना पक्ष जो आदेश देणार, तो ते शंभर टक्के ऐकतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप...

पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या पक्षाच्या सचिव आहेत. त्यांच्याबद्दल पक्ष आणि केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेईल. महाराष्ट्र भाजप त्यांच्या पाठीशी ताकदीने उभी आहे. त्यादेखील भाजप वाढवण्यासाठी तेवढ्याच ताकदीने मदत करतील, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

पंकजा मुंडे यांच्या बाबतीत अफवा पसरवणारे लोक कार्यरत आहेत. अशा कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. पंकजा मुंडे भाजपची आणि भाजप पंकजा मुंडे यांच्याशी प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्या भाजप सोडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असा ठाम विश्वास आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT