Bhai Jagtap and Shashikant Shinde
Bhai Jagtap and Shashikant Shinde Sarkarnama
विदर्भ

Bhai Jagtap News : सरकार खासगी प्राॅपर्टी आहे का? विरोधक भडकले; सभागृह तहकूब !

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Legislative Council News : अतिशय मानाचा असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आज सायंकाळी ६ वाजता मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात होत आहे. पण या कार्यक्रम पत्रिकेत विधानपरिषद सभापतींसह सदस्यांचीही नावे नाहीत. येवढेच काय तर विरोधी पक्षनेत्यांचेही नाव नाही. त्यावरून विरोधी पक्षाचे सदस्य भडकले आणि सभागृह बंद पाडले.

सभागृहात आरोग्याच्या प्रश्‍नावर ‘अर्धा तास चर्चा’ सुरू असताना भाई जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पत्रिका सभागृहाला दाखवत ते संतापले. ते म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. विधान परिषद सभागृहाचा यात साधा उल्लेखही नाही. हे वरचे सभागृह आहे. या सभागृहाचे अधिकार मोठे आहेत. साधा नावाचा उल्लेखही नसणे चीड आणणारे आहे.

मागील आठवड्यातही असाच एक प्रकार घडला होता. आता पुन्हा तेच होतंय. अशा नवनवीन परंपरा पडत असतील तर आम्ही याचा निषेध करतो. आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. महाराष्ट्र भूषण हा मोठा कार्यक्रम आहे आणि वरिष्ठ सभागृहाला निमंत्रण नाही. आमचा सन्मान कसा काढून घेऊ शकता? घटनेने दिलेले हे सभागृह आहे. आम्ही कार्यक्रमात जाऊन काळे झेंडे दाखवून तेथे तीव्र निषेध करू, असे भाई जगताप यांनी सुनावले.

मागच्या आठवड्यात चर्चा झाली होती. प्रवीण दरेकर बोलले होते. संसदीय कार्यमंत्र्यांनी सदस्यांचा मान राखला जाईल, असे सांगितले होते. आठवड्याभरानंतर ही दुसरी पत्रिका आहे की, ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांचेही नाव नाही. सरकार खासगी प्रॉपर्टी झाली आहे का? हुकूमशाही आहे का, असे प्रश्‍न करीत बंद करा हे सभागृह., हे चालणार नाही आणि रुलींग दिल्यावरही असेच होत असेल तर आम्ही हे सभागृह बंद पाडतो, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

फक्त मंत्र्यांचा किंवा त्यांच्या विभागाचा कार्यक्रम असता आणि आमचे नाव नसतं, तर ठीक होतं. पण या कार्यक्रमात तर विधानसभा अध्यक्षांचे नाव आहे. पण विधानपरिषद सभापतींचे नाही. शासकीय कार्यक्रमात आमची नावं नसतात, हे नेहमीचेच झाले आहे. आता आम्हाला याची सवय झाली. पण सभागृहाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. सत्र सुरू असतानाही जाणूनबुजून नाव टाकले जात नाही. पदाचा सन्मान असला पाहिजे, असे सचिन अहीर म्हणाले.

भाई जगतापांनी (Bhai Jagtap) जो मुद्दा मांडला, त्यांच्या भावनांची कदर करून निर्णय घेऊ. या पत्रिकेची चौकशी करू. शासन नक्कीच याची दखल घेईल, असे सांगत उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मागील आठवड्यातही असा विषय चर्चेला आला होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती यांच्यात बैठक होणे गरजेचे आहे, असे सांगत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही एक प्रयत्न केला. पण विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच होता. दरम्यान माझाच विषय असल्यामुळे मी रुलींग देणे सयुक्तिक नाही, असे म्हणत निलम गोऱ्हे यांनी सभागृह १२ वाजेपर्यंत तहकूब केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT