Bhandara Sand Mafiya
Bhandara Sand Mafiya Sarkarnama
विदर्भ

भंडाऱ्याच्या एसडीओंवर हल्ला प्रकरणी प्रहारच्या कार्यकर्त्याला अटक...

Abhijeet Ghormare

भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीत राजकीय लोकांचे साटेलोटे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी गेलेले भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह साहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांच्यावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला होता. फरार झालेले प्रहार संघटनेचे पवनी तालुकाध्यक्ष अक्षय तलमले यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भंडारा (Bhandara) उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यासह 27 एप्रिलच्या पहाटे पवनी तालुक्यात अवैध रितीने सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. दरम्यान, तीन टिप्पर अडविल्यानंतर अचानक २० ते २५ तस्करांनी (Sand Mafiya) लाठ्याकाठ्या आणि हातात फावडे घेऊन घटनास्थळ गाठत राठोड यांना मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेले पवनीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनाही मारहाण झाली.

अधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी धर्मेंद्र नखाते, राजेश मेघरे, राहुल काटेखाये, प्रशांत मोहरकर या चौघांना आधीच अटक केली आहे. तर काल अक्षय तलमले याला अटक केली आहे. अक्षय हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा पवनी तालुकाध्यक्ष आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यांमुळे वाळू तस्करीत राजकीय व्यक्तींचा सहभाग या प्रकरणातही पुढे आला आहे. अवैध धंद्यांमध्ये राजकीय लोकांचा सहभाग चिंतेची बाब आहे. आता पोलिस हे प्रकरण कसे हाताळतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

पवनीच्या तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वी असाच एक वाळूचा ट्रक पकडला होता. त्यावेळेला पोलिस उपस्थित असतानासुद्धा वाळू माफियांनी दमदाटी दिली होती. तेव्हाच वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर एसडीओंना मारहाणीची घटना घडली नसती. पण २७ एप्रिलला झालेल्या घटनेमुळे महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांनाच वाळू माफियांनी शह दिल्याने आज त्यांची दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे. वाळू माफियांना राजकारणी लोकांचा वरदहस्त असल्याने आज त्यांची दादागिरी वाढली असल्याचे दिसतेय. पण या हल्ल्यामध्ये राजकीय पक्षाचा कार्यकर्ताच सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT