Nana Patole | Praful Patel
Nana Patole | Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Bhandara Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदियात ‘भेल’वरून पुन्हा तापतेय राजकारण !

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 News : एखादा प्रकल्प आला काय किंवा बंद झाला काय, सामान्य जनतेला त्याचे काही फारसे सोयरसूतक राहत नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये ‘भेल’ प्रकल्प आणला होता. पण नंतर तो बंद पडला.

त्याची अनेक कारणे आहेत. आतापर्यंत त्या प्रकल्पाबाबत नेते फारसे बोलत नव्हते. पण लोकसभा निवडणूक आली आणि ‘भेल’ला पुन्हा महत्व आले. इतके की नेत्यांनी या प्रकल्पाची भेलपुरी करून टाकली आहे.

यंदाचा भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा मुख्य मुद्दा 'भेल' प्रकल्पावर केंद्रित झाला आहे. याची प्रचिती महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनात पाहायला मिळाली.

भेलचा प्रकल्प पूर्ण न होण्यास जबाबदार कोण, यावरून पटेल-पटोले पुन्हा भिडल्याचे भंडाराकरांनी पुन्हा एकदा पाहिले. त्यामुळे भेलची 'भेल'पुरी करण्यास आपण जबाबदार नाही, अशी भूमिका हे दोन्ही नेते आता घेताना दिसत आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले. दरम्यान, दोन्ही आघाड्यांच्या जाहीर सभा झाल्या. या वेळी महायुतीचे नेते अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी जाहीर भाषणास सुरुवात करताच भेल प्रकल्पाचा मुद्दा उकरून काढला. पटेल म्हणाले, या मतदारसंघात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केले. भेल प्रकल्प आणला. मात्र, आम्हाला घरी बसविण्याच्या नादात 'त्यांना' जवळ केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘भेल’ची भेलपुरी करून नंतर तेही पळून गेले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता केली. महायुतीचे उमेदवार भाजपचे सुनील मेंढे यांचे नामांकन दाखल केल्यावर मुस्लिम लायब्ररी चौकात जाहीर सभा झाली.

या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह महायुतीमधील पक्षांची नेते मंडळी, माजी आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.

दुसरीकडे पटेलांच्या आरोपावर शांत बसतील ते नाना पटोले कसले? त्यांनीही महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून भेल प्रकल्पाची ‘भेलपुरी’ कोणी केला, याचा पाढाच वाचला. नाना म्हणाले उद्योग नसलेल्या या जिल्ह्यात भेलसारखा प्रकल्प आणला.

मात्र, नंतर राज्यसभा सदस्यपदावर जाऊनही हा प्रकल्प कोणी अडवून ठेवला, हे सर्व जनता जाणते. आता तर खासगीकरणात या प्रकल्पाची भेलपुरी कोण बनवत आहे, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

महाआघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Patole) यांचे नामांकन भरल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, या जिल्ह्यात व्हिडिओकॉन प्रकल्पाची घोषणा केली होती. तो कुठे गेला, हे त्यांनी सांगावे. देवाडाला उद्योगाच्या नावाखाली प्रदूषणाच्या खाईत लोटणाऱ्यांनी तेथील नागरिकांच्या आरोग्याबद्दल आधी बोलावे, असा खरमरीत समाचार नानांनी घेतला आहे.

आधीच भंडारा गोंदियाचे मतदार जिल्ह्यात कोणताही रोजगार निर्मिती करेल, असा मोठा उद्योग नसल्याने नाराज आहेत. त्यातही भेलसारखा उद्योग भंडारा जिल्ह्यात येऊन बंद पडल्याने रोजगाराच्या शोधात असलेले मतदार जिल्ह्यातील नेत्यांवर नाराज आहे, त्या नाराजीचा वचपा येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला भोगाव लागू नये म्हणून जिल्ह्यातील हे मोठे नेते तो मी नव्हेच! अशी बदावली करत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT