Bhandara District NCP Political News : भंडारा जिल्ह्यातील प्रफुल्ल्ल पटेल यांचे खास समजले जाणारे ठाकचंद मुंगुसमारे नुकतेच शरद पवार गटात गेले. तेथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे. ठाकचंद मुंगुसमारे हे प्रफुल्ल्ल पटेलांचे निकटवर्तीय मानले जातात. (Thakchand Mungusmare is considered close to Prafulla Patel)
अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांचे शिलेदार म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. असे असताना ठाकचंद मुंगुसमारे यांचे अचानक शरद पवार गटात जाणे, ही प्रफुल्ल पटेलांची खेळी आहे का, अशी शंका घेतली जात होती. पण आता ठाकचंद मुंगुसमारे यांनी प्रफुल्ल पटेलांची साथ सोडण्याचे खरे कारण पुढे आले आहे. याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे हे आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंगुसमारे सुरुवातीला शरद पवार यांच्या भेटीला मुंबई गेले होते. दरम्यान, मुंगुसमारे यांनी सर्वात आधी प्राधान्य शरद पवार यांना दिले होते. मात्र, आपण प्रफुल्ल पटेलांचे समर्थक असल्याने शरद पवार यांच्या भेटीला मुंगुसमारे का गेले, हे कारण पुढे करत ‘आता तू (मुंगुसमारे) माझ्या दरवाजावर उभा राहू नको, चल निघ’ असे म्हणत आमदार कारेमोरे यांनी मुंगुसमारेंना अपमानित केले होते.
एवढेच नव्हे तर कारमोरेंचा ‘राइट हॅंड’ समजल्या जाणाऱ्या ‘त्या’ खास माणसाने मुंगुसमारेंवर चक्क खुर्ची उचलली होती. कारेमोरेंच्या निवडणुकीत मुंगुसमारेंनी ‘रक्ताचे पाणी आणि हाडाची काडं’ केली होती. असे असताना त्यांनी अपमानित करणे मुंगुसमारेंना पटले नाही. त्यामुळे त्यांनी तडक शरद पवार गटात प्रवेश घेतला आणि युवक आघाडीचे जिल्हाध्यक्षपदही पदरी पाडून घेतले.
आता मुख्य मुद्दा असा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाने महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. विदर्भात भंडाऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी आता आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. असे असताना ठाकचंद मुंगुसमारे यांच्या अचानक शरद पवार गटात प्रवेशाने राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंगुसमारेंनी अजित पवार गट सोडल्याचे खरे कारण पुढे आल्यावर अजित पवार गटाला भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते सांभाळणे अवघड होणार, हे निश्चित आहे. पक्षश्रेष्ठींनी जातीने लक्ष घालून वेळीच असे प्रकार रोखले नाही, तर आगामी निवडणुका अजित पवार गटाला जड जातील, यात तिळमात्रही शंका नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.