विदर्भ

Bhandara Teacher News : तब्बल 243 निवृत्त गुरुजी म्हणतात, ‘अभी तो मै जवान हूँ...’

अभिजीत घोरमारे

सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही, अशी ग्वाही देणाऱ्या शिंदे सरकारने अद्याप कायमस्वरूपी शिक्षकभरती केली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया राबवून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी भंडारा जिल्ह्यात तब्बल 243 सेवानिवृत्त गुरुजींचे अर्ज आले आहेत.

ही बाब उघड झाल्यानंतर हे गुरुजी म्हणजे ‘अभी तो मै जवान हूँ...,’ असाच प्रकार असल्याची चर्चा जिल्ह्यात चवीने होत आहे. पुढील आठवड्यात त्यांना नियुक्ती दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. तथापि, या प्रकारामुळे शिक्षक संघटना आणि टीईटीपात्र उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

आज ना उद्या नोकरी मिळेल, या आशेवर असलेल्या अभियोग्यताधारक उमेदवारांना बेरोजगार ठेवून सेवानिवृत्त शिक्षकांना 20 हजार रुपये मानधनावर घेण्यात येत आहे. या पदासाठी भंडारा जिल्हा परिषदेने काढलेल्या जाहिरातीनंतर 243 सेवानिवृत्त शिक्षकांनी नोकरीसाठी अर्ज केले. आता त्यांना रुजू होण्याचे आदेश लवकरच देण्यात येणार आहेत. या संतापजनक प्रकारामुळे शिक्षकपदासाठी पात्र उमेदवारांमध्ये शासनाविरुद्ध कमालीचा असंतोष धुमसत आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेसाठी चारशेहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. एक शाळा आणि चार तुकड्या असा प्रकार अनेक गावांत आहे. तर दुसरीकडे शाळा गोठवून त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी मारली जातात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे अध्ययन, गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा या सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होत आहे.

आता या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होताच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेणाऱ्या 243 शिक्षकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. आता त्यांना नोकरीवर रुजू होण्यासंदर्भात जिल्हा परिषदेतून आदेश काढण्यात येणार आहेत. कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या या शिक्षकांचे वय 60 ते 65 वर्षे आहे. सेवानिवृत्त होऊन त्यांना पाच ते सात वर्षे झाली आहेत. त्यातच या रिटायर्ड शिक्षकांना आजघडीला 40 ते 45 हजारांच्या आसपास पेन्शनही मिळते. त्यामुळे हे मानधन त्यांना बोनस ठरणार आहे. वृद्धत्वाकडे झुकलेले आणि आजारपणाने ग्रासलेले हे सेवानिवृत्त शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा जिल्हा आधीच उद्योगविरहित असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अधिक आहेत. त्यातही डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत शासन सेवानिवृत्तांना नोकरी देत असताना ही सुशिक्षित मंडळी शांत आहेत. त्यामुळे न्यायमार्गाने आपल्या हक्काचा लढा तीव्र करण्याची गरज आहे, अन्यथा त्यांच्या वाट्याला काही येणार नाही.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT