BHEL in Bhandara. Google
विदर्भ

Bhandara : ‘भेल’ ठरला फेल; राजकीय उदासीनतेमुळे जिल्हा उद्योगाविना

Unemployment : बांधकाम सुरू होण्यापूर्वीच नामशेष झालेल्या प्रकल्पाने तरुणाईचे स्वप्नभंग

अभिजीत घोरमारे

Industrial Development : विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची क्षमता असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ‘भेल’ प्रकल्पाची लीज एमआयडीसीने ऑगस्ट 2023 महिन्यात रद्द केली. त्यामुळे हा प्रकल्प बांधकामापूर्वीच नामशेष झालाय. या प्रकल्पासाठी शासनाने खरेदी केलेली 510 एकर जागा आता गाजरगवताने भरलीय. त्यामुळे रोजगार मिळेल या आशेवर असलेल्या तरुणाईचे स्वप्नही भंगलेय. आता ही जागा नवीन उद्योगाच्या प्रतीक्षेत आहे. एखादा कारखाना येईल आणि हाताला काम मिळेल, या आशेवर तरूणाई आहे.

भंडारा जिल्ह्यातील प्रस्तावित ‘भेल’ (BHEL) प्रकल्पाकडे तरुणाई डोळ लाऊन बसली होती. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मुंडीपार (भंडारा) येथे वीज कंपनीला निर्मितीसाठी लागणारी उपकरणे तयार करण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी 270 शेतकऱ्यांकडून 510 एकर जागा संपादीत करण्यात आली होती. मे 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

‘भेल’चा कारखाना सुरू होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असे सर्वांना वाटत होते. अशातच 2014 मध्ये देशात सत्तांतर झाले आणि भंडारावासियांचे स्वप्न भंग झाले. तेव्हापासून आतापर्यंत ‘भेल’साठीच्या या जागेवर उद्योग तर उभा राहिला नाही, पण गाजरगवत नक्कीच वाढले. एकाही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात पाठपुरावा केला नाही. ‘भेल’ प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, यासाठी नागपूर एमआयडीसीने मार्च 2014, फेब्रुवारी 2014 आणि 2023 मध्ये अवजड उद्योग मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. परंतु प्रकल्प ‘भेल’कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एमआयडीसीचे विभागीय अधिकारी एम.डी. पटेल यांनी ‘भेल’ कंपनीला 11 ऑगस्ट 2023 रोजी पत्र पाठवत लीज रद्द करीत असल्याचे कळविले. माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांची भेट घेऊन ही जमीन अन्य उद्योगांना देण्याची मागणी केली. त्यामुळे या जागेवर आता नवीन उद्योगाची प्रतीक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा जिल्हा खनिज संपत्ती, मुबलक पाणी, वनसंपदा व भूभागाने संपन्न आहे. शेती हे अर्थार्जनाचे मुख्य साधन आहे. धान उद्योग उभारणीसाठी लागणारे प्रमुख घटक भंडाऱ्यात उपलब्ध असल्याने औद्योगिक विकासाला येथे प्रचंड वाव आहे. महामार्गाचे व्यापक जाळेही भंडाऱ्यात आहे. जवळच बिरसी विमानतळ आहे. येथुन विमानसेवा सुरू आहे. कोलकाता ते मुंबई हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. त्यामुळे दळणवळणासाठी प्रचंड सोयीचा असा भंडारा जिल्हा आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या सीमा लागून आहेत. एकीकडे नागपूर व दुसरीकडे गोंदियाच्या मध्यभागी असल्यामुळे औद्योगिक विकास येथे होऊ शकते.

अशा सर्व सुविधा असतानाही केवळ राजकीय उदासीनतेमुळे भंडारा उद्योग विकासापासून वंचित आहे. सद्य:स्थिती भंडाऱ्यातील अनेक उद्योग केवळ कागदांवरच आहेत. एखादा मोठा उद्योग येथे यावा व तरुणाईच्या हाताला काम मिळाल्यानं त्यांना जिल्हा सोडून जाण्याची गरज भासू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT