Bhandara ZP Sarkarnama
विदर्भ

भंडारा झेडपी : राष्ट्रवादीचे राजू देशभ्रतार विजयी, तर देहू नगरपंचायतीवर एकहाती सत्ता...

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचा भंडारा (Bhandara) हा गृहजिल्हा असल्याने येथे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

भंडारा : भंडारा (Bhandara) गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Election) काल मतदान झाल्यानंतर आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) खाते उघडले असून त्यांचे राजू देशभ्रतार हे उमेदवार विजयी झाले आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी हा विजय मिळविला आहे. तर देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. (Dehu Nagar Panchayat Election Result Updates)

निकालाची सुरूवात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चांगली झालेली आहे. तर पंचायत समितीच्या १०४ जागांपैकी भाजपने कांद्री, जाम या दोन जागांवर विजय मिळविला आहे. येत्या तासाभरात मतदारांचा कल स्पष्ट होणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा हा गृहजिल्हा असल्याने येथे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगरपंचायतींवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागलेली आहे.

राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेले तिन्ही पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढले. भाजपनेही या निवडणुकीत चांगलाच जोर लावलेला आहे. त्यांच्या नेत्यांनीही दोन्ही जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. खासदार सुनील मेंढे यांनी शिस्तबद्ध प्रचार केलेला आहे. त्याचा फायदा भाजपला कितपत होणार, हे आजच्या निकालानंतर कळणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक खऱ्या अर्थाने चर्चेत आली ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत धिंगाणा घातला होता. त्यापायी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, अटक झाली आणि त्यांना रात्रभर तुरुंगांची हवादेखील खावी लागली. त्यानंतर मात्र आमदार कारेमोरे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारात दिसले नाही. किंबहुना ते प्रचाराला फिरकेलेही नाहीत. त्यांच्या या कृतीनंतर या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्याचा फटका बसेल, असे बोलले जात आहे. त्याचा निकाल आज लागणार आहे.

दुसरी घटना म्हणजे नाना पटोले यांनी जेवनाळा या गावात प्रचारार्थ असताना ‘मी मोदींना शिव्याही देऊ शकतो आणि मारूही शकतो’, असे वक्तव्य करून देशभरात खळबळ उडवून दिली. त्यानंतर पटोलेंवर देशभरातून टिकेची झोड उठली. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यांत तक्रारी देत आंदोलने केली आणि पटोलेंवर गुन्हे दाखल करण्याची आणि अटक करण्याची मागणी केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर गुन्हे दाखल होईपर्यंत कोराडी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यांना काल पोलिसांनी अटक केली होती. भाजप मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी असे प्रकार करीत असल्याचा आरोप करीत या प्रकाराचा कॉंग्रेसला कुठलाही फटका बसणार नसल्याचे काल सांगितले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या दोन प्रकारांचा कुणाला किती फटका बसेल, हेसुद्धा आज निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

निवडणूक विभाग आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लागलेला आहे. आता प्रत्येकाला निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात पाय रोवायचे असल्याने प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्या पत्नी वर्षाबेन पटेल, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मंत्री छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासह उत्कृष्ठ वक्ते आमदार अमोल मिटकरी यांनाही प्रचारात उतरविले होते. दुसरीकडे नाना पटोले यांना विजयाचा आत्मविश्‍वास असल्याने ते स्वतः आणि विश्‍वजित कदम यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे इतर नेते इकडे दिसले नाहीत. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू असे नाना पटोले यांनी म्हटलेले आहे. शिवसेनेने या निवडणुकीत दोनच जागा लढवल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT