BJP sarkarnama
विदर्भ

भाजपला धक्का; आमदराच्या गावासह दत्तक गावातंच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

सरकारनामा ब्यूरो

तेल्हारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharasakle) यांच्या तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावातच भाजप उमेदवाराला केवळ ३६ मते मिळाली असून, भांबेरी पंचायत समिती सर्कलमधील भाजप उमेदवाराची अनामत जप्त झाली. दानापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये दानापूर गाव आमदारांनी दत्तक घेतले होते. त्या सर्कलमध्ये भाजप जिल्हा परिषद उमेदवाराची अनामत जप्त झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील अंतर्गत कलहाचा फटका येथे पक्षाला बसला असून, त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (BJP candidates deposit confiscated)

काही वर्षांपूर्वी तेल्हारा तालुका हा भाजपचा गड मानला जात होता. अकोला जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य तेल्हारा तालुक्याने दिले आहे. परंतु गेले काही वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधनीला या जिल्ह्यात खिळ बसली आहे. भाजपमधील अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यातील दानापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपचे उमेदवार गणेश ढाकरे यांना केवळ ५२३ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. मागील वेळेस भांबेरी सर्कलमधून निवडून आलेले विलास पाथ्रीकर यांना नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये केवळ ५७३ मते मिळाली. त्यामुळे त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले.

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तेल्हारा तालुक्यातील भांबेरी हे गाव भारसाकडे यांचे आहे. दानापूर हे गाव आमदारांनी दत्तक घेतले आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे आमदारांना व भाजपला हा मोठा धक्का मानल्या जात आहे. यापूर्वी तेल्हारा पंचायत समितीमध्ये भाजपची सत्तासुद्धा होती; परंतु या काही वर्षांमध्ये संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तसेच आयात केलेल्या कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी बाजूला जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी दिसून आली होती. तेल्हारा नगर परिषदमध्ये भाजपची सत्ता व नगराध्यक्ष असून सुद्धा भाजप आमदारांना मिळालेले कमी मते व अपक्ष उमेदवारांना मिळालेली सर्वाधिक मते याचा विचार केला असता भाजप संघटनात्मक दृष्टिकोनातून किती दूर जात आहे. याचा प्रत्यय आला.

पक्ष व कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपा!

एखाद्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची असेल तर त्या सरकलमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचे मने जाणून घेण्याची पद्धत भाजपमध्ये यापूर्वी होती व कार्यकर्त्यांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणेच उमेदवारी दिली जात होती; परंतु या काही वर्षांमध्ये उमेदवार लादण्याची पद्धत भाजपमधिल निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत आहे. कुणाच्याही मागे न जाता स्वाभिमानाने भाजपची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, अशी इच्छा अनेक भाजप कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT